भर उन्हात स्ट्रेचरवरून रुग्ण दवाखान्यात दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
वेळ शुक्रवारी दुपारी 12 ची, रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज, रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने रस्ता बंद, घरापासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे शक्य नसल्यामुळे रुग्णाला भर उन्हातून हॉस्पिटलपर्यंत स्ट्रेचरवरून ढकलून आणण्याची वेळ नातेवाईकांवर आली. हे चित्र पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली.
शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे केली जात आहेत. हे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु विकासकामे राबविताना नागरिकांचा विचार केला जात नसल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णांचे तर त्याहून अधिक हाल होत आहेत.
शुक्रवारी दुपारी आरपीडी कॉर्नरपासून एका रुग्णाला स्ट्रेचरवरून ढकलत आणून हॉस्पिटलला आणावे लागले. अनगोळ नाका ते गोवावेसपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात असल्याने रुग्णांना फटका बसत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका जाण्यापुरती तरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.