जर्मनीत ई-महामार्गाची निर्मिती
वारंवार चार्जिंगपासून मुक्तता मिळणार
बस किंवा ट्रक एकदम इलेक्ट्रिक रेल्वेंप्रमाणे धावू लागल्यास आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे आता शक्य झाले आहे. जर्मनीत सुमारे 5 किलोमीटर लांबीचा (दोन्ही बाजूला) इलेक्ट्रिफाइड हायवे (महामार्ग) तयार करण्यात आला आहे. प्रँकफर्टनजीक निर्माण या महामार्गावर अलिकडेच थॉमस श्मीडर यांनी स्वतःचे अवजड वाहन चालवून पाहिले. त्यांचा ट्रक डिझेलवरून इलेक्ट्रिक मोडवर येतातच इंजिनचा आवाज एकदम कमी झाला.
जगभरात वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्यूल सेल असणारे वाहन यावर उपाय ठरत आहे. पण दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी अधिक पल्ल्याच्या बॅटऱया तयार करणे महागडे आहे. याचमुळे जर्मनी या ई-हायवेवर काम करत आहे.
परीक्षणास प्रारंभ
स्कॅनिया, मॅन आणि नेविस्टार यासारखे ट्रक निर्माण करणारी कंपनी ट्रेटनने यावर भूमिका मांडली आहे. हायड्रोजन फ्यूल निर्माण करण्यास विशेष ऊर्जा लागते. याचमुळे कंपनी सातत्याने विकसित होणाऱया बॅटऱया आणि इलेक्ट्रिफाइड हायवे या दोन्ही पर्यायांवर काम करत आहे. सध्या कामगिरी तपासण्यासाठी प्रतिदिन या महामार्गावर 20 ट्रक चालविले जात आहेत.
सरकारचा सहभाग
अवजड वाहनांच्या मार्गांचे विद्युतीकरण प्रथम करणे शहाणपणाचे ठरणार आहे. सुमारे 4 हजार किलोमीटरचा ई-हायवे जर्मनीची 60 टक्के वाहतूक हाताळू शकेल. जर्मनीचे पर्यावरण मंत्रालय अशाप्रकारचे तीन हायवे तयार करत आहे. भरभक्कम पायाभूत खर्च असूनही ओव्हरहेड केबल ट्रक सर्वात प्रभावी पर्याय असल्याचे अध्ययनातून सिद्ध झाल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
1 किमीसाठी 22 कोटींचा खर्च
एक किमी इलेक्ट्रिफाइड हायवे निर्माण करण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पण ट्रकांमध्ये बसविली जाणारी यंत्रणा अत्यंत सोपी आहे. जर्मनीतील इलेक्ट्रॉनिक दिग्गज कंपनी सीमेन्सने या परीक्षणासाठी हार्डवेअर पुरलिवे आहे. वीज पुरवठय़ातून ट्रकाची बॅटरीची चार्ज होत असते. यामुळे शहरी वाहतुकीत कमी अंतर गाठण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळू शकते. तसेच ठिकठिकाणी बॅटरी चार्जिंग स्टॉप ठेवण्याची गरज संपुष्टात येणार आहे. चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.