सामनावीर राहुल तेवातिया-रियान पराग विजयाचे शिल्पकार, सनरायजर्स हैदराबादला 5 गडी राखून नमवले
वृत्तसंस्था/ दुबई
राहुल तेवातिया (नाबाद 45) व रियान पराग (नाबाद 42) या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 7.5 षटकात अभेद्य 85 धावांची भागीदारी साकारल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला 5 गडी राखून धूळ चारली. प्रारंभी, सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 4 बाद 158 धावांची मजल मारली तर प्रत्युत्तरात राजस्थानने 19.5 षटकात 5 बाद 163 धावांसह दमदार विजय संपादन केला. राहुल तेवातिया सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
159 धावांचे आव्हान असताना राजस्थान रॉयल्सने फारशी आश्वासक सुरुवात केली नव्हती. उलटपक्षी, आघाडीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने त्यांचा निम्मा संघ 78 धावांमध्येच तंबूत परतला होता. पण, हंगामातील पहिल्या टप्प्यात रोमांचक विजय संपादन करुन देणाऱया तेवातियाने या लढतीतही फटकेबाजीचा आणखी एक अविष्कार साकारला आणि रियान परागच्या साथीने रोमांचक विजय प्राप्त करुन दिला.
ही जोडी एकत्र आली, त्यावेळी राजस्थानच्या खात्यावर 12 षटकात 5 बाद 78 धावा होत्या. उर्वरित 8 षटकात आणखी 80 धावांची गरज असताना तेवातिया व पराग यांनी फटकेबाजीला सुरुवात केली व पाहता पाहता विजय आवाक्यात आणला. सनरायजर्सतर्फे रशीद खान व मोहम्मद खलील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मात्र, ते तेवातिया व पराग यांना रोखू शकले
नाहीत.
तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादच्या डावात मनीष पांडे (54) व कर्णधार डेव्हिड वॉर्नर (48) यांचे योगदान लक्षवेधी ठरले. बेअरस्टो डावातील चौथ्या षटकात 16 धावांवरच बाद झाला. पण, त्यानंतर वॉर्नर व पांडे यांनी तिसऱया गडय़ासाठी 73 धावांची दमदार भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. केन विल्यम्सन 12 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिला. प्रियम गर्ग (15)डावातील शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला.
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. आर्चर 48 (38 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. सॅमसन, गो. कार्तिक त्यागी 16 (19 चेंडूत 1 चौकार), मनीष पांडे झे. तेवातिया, गो. उनादकट 54 (44 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 22 (12 चेंडूत 2 षटकार), प्रियम गर्ग धावचीत (आर्चर-बटलर) 15 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 4 बाद 158.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-23 (बेअरस्टो, 4.4), 2-96 (वॉर्नर, 14.4), 3-122 (मनीष पांडे, 17.4), 4-158 (गर्ग, 19.6).
गोलंदाजी : जोफ्रा आर्चर 4-0-25-1, श्रेयस गोपाल 4-0-31-0, कार्तिक त्यागी 3-0-29-1, जयदेव उनादकट 4-0-31-1, राहुल तेवातिया 4-0-35-0, बेन स्टोक्स 1-0-7-0.
राजस्थान रॉयल्स : बेन स्टोक्स त्रि. गो. अहमद 5 (6 चेंडूत 1 चौकार), जोस बटलर झे. बेअरस्टो, गो. अहमद 16 (13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ धावचीत (शंकर/नटराजन) 5 (6 चेंडू), संजू सॅमसन झे. बेअरस्टो, गो. रशीद 26 (25 चेंडूत 3 चौकार), रॉबिन उत्थप्पा पायचीत गो. रशीद 18 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रियान पराग नाबाद 42 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), राहुल तेवातिया नाबाद 45 (28 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार). अवांतर 6. एकूण 19.5 षटकात 5 बाद 163.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-7 (स्टोक्स, 1.2), 2-25 (स्मिथ, 3.4), 3-26 (बटलर, 4.1), 4-63 (उत्थप्पा, 9.1), 5-78 (सॅमसन, 11.6).
गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-32-0, खलील अहमद 3.5-0-37-2, टी. नटराजन 4-1-32-0, अभिषेक शर्मा 1-0-11-0, रशीद खान 4-0-25-2, विजय शंकर 3-0-22-0.