गोलंदाजांचा भेदक मारा, स्मिथ-बटलरची 98 धावांची अभेद्य भागीदारी, धोनी 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला खेळाडू
वृत्तसंस्था/ अबु धाबी
जोस बटलर (48 चेंडूत नाबाद 70) व स्टीव्ह स्मिथ (नाबाद 26) यांनी चौथ्या गडय़ासाठी 98 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा 7 गडी राखून सहज धुव्वा उडवला. प्रारंभी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 125 अशी किरकोळ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात बटलर-स्मिथ यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 17.3 षटकात 3 बाद 126 धावांसह चेन्नईचा सहज धुव्वा उडवला.
वास्तविक, विजयासाठी 126 धावांच्या किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे पहिले तीन आघाडीवीर अवघ्या 4.3 षटकात 28 धावांमध्येच तंबूत परतले होते. पण, स्टीव्ह स्मिथ व जोस बटलर या ऑस्ट्रेलियन-इंग्लिश फलंदाजी जोडीने चेन्नईचे सर्व मनसुबे पार धुळीस लावले. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 13 षटकात 98 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
प्रारंभी, मध्यमगती गोलंदाज चहरने स्टोक्स व सॅमसन यांना तर हॅझलवूडचे उत्थप्पाला बाद केले. मात्र, ते फक्त पेल्यातील वादळ ठरले. स्मिथ-बटलर यांच्यासमोर चहरसह चेन्नईच्या अन्य कोणत्याही गोलंदाजाची अजिबात डाळ शिजली नाही.
3 बाद 28 या कठीण परिस्थितीतून मार्गोत्क्रमण करताना बटलरने आक्रमक फलंदाजीवर भर दिला तर स्मिथने बचावात्मक फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. यामुळे, एकीकडे विजयाकडे आगेकूच करत राहण्यात व दुसरीकडे, विकेटस सांभाळून ठेवण्यात मदत झाली. पुढे विजय आवाक्यात येताच या जोडीने जोरदार फटकेबाजी सुरु केली आणि डावातील 18 व्या षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले.
चेन्नईला फलंदाजीत अपयश
तत्पूर्वी, रविंद्र जडेजा (30 चेंडूत नाबाद 35) व महेंद्रसिंग धोनी (28 चेंडूत 28) यांच्या योगदानानंतर चेन्नई सुपरकिंग्स संघाने 5 बाद 125 धावांची जेमतेम मजल गाठली होती. प्रथम फलंदाजी करताना आघाडीतील फलंदाज स्वस्तात गारद झाल्यानंतर चेन्नईच्या धावसंख्येवर खूपच मर्यादा राहिल्या.
धोनीसाठी हा आयपीएल इतिहासातील 200 वा सामना ठरला. एखाद्या खेळाडूने 200 आयपीएल सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सलामीवीर सॅम करणने 25 चेंडूत 22 धावा केल्या. राजस्थानतर्फे गोलंदाजीच्या आघाडीवर जोफ्रा आर्चर (4 षटकात 1-20), कार्तिक त्यागी (4 षटकात 1-35), श्रेयस गोपाल (4 षटकात 1-14), राहुल तेवातिया (4 षटकात 1-18) यांनी प्रत्येकी 1 बळी घेत नियंत्रित मारा केला आणि चेन्नईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले.
प्रारंभी, चेन्नईने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, फॅफ डय़ू प्लेसिस व शेन वॅटसन हे दोन्ही दिग्गज फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईची 4 षटकातच 2 बाद 26 अशी दैना उडाली होती. आर्चरच्या आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडूवर जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात प्लेसिसने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर तैनात बटलरकडे सोपा झेल दिला. त्याला 9 चेंडूत एका चौकारासह 10 धावांवर समाधान मानावे लागले.
वॅटसन देखील बाद झाल्याने चेन्नईला आणखी एक धक्का बसला. लेगस्टम्पवरील चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून चूक झाली आणि तेवातियाने मिडविकेटवर आपली जबाबदारी चोख पार पाडली. वॅटसन पहिल्या 2 चेंडूत 2 चौकार वसूल करण्यात यशस्वी ठरला होता. पण, तिसऱयाच चेंडूवर त्याची ही खेळी संपुष्टात आली. तेवातियाने झेल टिपल्यानंतर वॅटसनला देखील आपल्या या चुकीच्या फटक्याबद्दल आश्चर्य लपवता आले नाही.
सलामीवीर सॅम करण व मधल्या फळीतील अम्बाती रायुडू या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 27 धावा जोडल्या. पण, सॅम करणचा दडपण झुगारुन पुढे सरसावत उत्तूंग फटका लगावण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि ही जोडीही फुटली. लाँगऑफवरील बटलरने सोपा झेल पूर्ण केला. मधल्या फळीतील रायुडूने 2 चौकारांसह आक्रमक फटकेबाजीचे इरादे स्पष्ट केले. एकदा पंचांनी पायचीत बाद दिल्यानंतर धोनीच्या सल्ल्याने डीआरएस घेतल्याने त्याला जीवदानही मिळाले होते.
पण, नंतर या संधीचा तो फारसा लाभ घेऊ शकला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने स्वीपचा फटका लगावण्याच्या प्रयत्नात फिरकीपटू तेवातियाच्या गोलंदाजीवर सॅमसनकडे झेल दिला. सॅमसनने डावीकडे काही पावले सरकत झेल टिपला. रायुडू बाद झाला, त्यावेळी चेन्नईची 10 षटकात 4 बाद 56 अशी पडझड झाली होती.
त्यानंतर धोनी (28 चेंडूत 28) व रविंद्र जडेजा ही अनुभवी जोडी क्रीझवर जमली आणि या उभयतांनी उत्तूंग फटकेबाजी करण्याऐवजी धावफलक हलता ठेवण्यावर अधिक भर दिला. 18 व्या षटकात धोनी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला, त्यावेळी ही जोडी फुटली. वास्तविक, फटका लगावल्यानंतर धोनीचा केवळ एकच धाव घेण्याचा इरादा होता. पण, जोफ्रा आर्चरकडून चूक झाल्यानंतर धोनीने दुसऱया जडेजाला दुसऱया धावेसाठी कॉल दिला. अर्थात, आर्चरने थ्रो केल्यानंतर सॅमसनने यष्टी उदध्वस्त केली, त्यावेळी धोनी फक्त इंचभर दूर राहिला. हा निर्णय तिसऱया पंचांकडे सोपवण्यात आला होता.
या हंगामात बॅड पॅचमधून जात असलेल्या केदार जाधवला (7 चेंडूत नाबाद 4) येथील लढतीत देखील झगडावे लागले. दुसरीकडे, एक बाजू लावून धरणाऱया जडेजाने आर्चरला सलग दोन चौकार फटकावत धावगती उंचावण्याचा प्रयत्न सुरु केले. आर्चरच्या या डावातील 19 व्या षटकात चेन्नईने 11 धावा वसूल केल्या. स्टोक्सच्या शेवटच्या षटकात चेन्नईला फक्त 7 धावा करता आल्या.