हायकमांडच्या भेटीनंतर येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना हायकमांडने केलेली नाही. आपण राजीनामा देत असल्याचे वृत्त साफ खोटे आहे. राज्यात नेतृत्त्व बदलाचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याविषयी हायकमांडने सूचना केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दरम्यान, बेंगळूरमध्ये परतल्यानंतर देखील त्यांनी राजीनामा देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच ऑगस्ट महिन्यात पुन्हा दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱयावर गेलेल्या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दरम्यान, राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांवर येडियुराप्पांना हायकमांडने राजीनामा देण्याची सूचना दिल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. याविषयी शनिवारी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पांनी राजीनामा आणि नेतृत्त्व बदलाचे वृत्त फेटाळून लावले. हायकमांडने आपल्याला राजीनामा देण्याची सूचना केलेली नाही. याविषयी प्रसारित झालेल्या वृत्तामध्ये तथ्य नाही. 26 जुलै रोजी आपण मुख्यमंत्रिपदी येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. उर्वरित कालावधीसाठीही आपणच मुख्यमंत्रिपदी असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘नॉट ऍट ऑल’
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, ‘नॉट ऍट ऑल’ असे तीनवेळा उच्चारण केले. तर प्रसिद्धी माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृत्तांविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी ‘धिस इज नॉट ट्रू’ अशी प्रतिक्रिया दिली. पुढील निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. वरिष्ठांच्या सूचनेवरून पुन्हा एकदा दिल्ली दौरा करणार आहे. आपल्या कार्याविषयी श्रेष्ठींनी समाधान व्यक्त केले असून पक्षसंघटनेवरही अधिक लक्ष देण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले.
जे. पी. नड्डा, राजनाथसिंग यांची घेतली भेट
नेतृत्त्वबदलासंबंधी राज्यात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा हायकमांडच्या भेटीसाठी शुक्रवारी नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तर शनिवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. दिल्लीतील मोतीलाल नेहरु रोडवरील निवासस्थानी जे. पी. नड्डा यांची येडियुराप्पांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र आणि राज्य भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र होते. उभय पिता-पुत्रांनी राज्यातील राजकीय घडामोडींविषयी जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. राज्यात नेतृत्त्व बदलाविषयी अनावश्यकपणे मुद्दा उचलून धरणाऱया नेत्यांना चाप लावण्याची विनंती येडियुराप्पा यांनी केल्याचे समजते. त्यानंतर येडियुराप्पांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली.
…अन् शहांनी भेटीसाठी बोलावले
या भेटीनंतर बेंगळूरला परतण्याच्या तयारीत असलेल्या येडियुराप्पांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावून घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. अमित शहा यांची भेट शक्य न झाल्याने परत बेंगळूरला जाण्यासाठी येडियुराप्पा विमानतळाकडे निघाले. याच दरम्यान, फोन करून अमित शहांनी त्यांना भेटीसाठी बोलावून घेतले.