हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदासाठी निवड : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह शुभेच्छांचा वर्षाव,लवकरच स्वीकारणार पदभार
प्रतिनिधी /पणजी
भाजपाचे वरिष्ठ नेते तथा गोव्याचे माजी सभापती व माजी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 67 वर्षीय आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे 21 वे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी देशातील आठ राज्याच्या राज्यपालपदाच्या नियुक्त्या करणारा आदेश जारी केला आहे. त्यात आर्लेकर यांचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी बंगारु दत्तात्रय हे कार्यरत होते. आता त्यांची हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील विविध राज्याच्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतीभवनमधून झाल्यानंतर स्वतः राष्ट्रपतींनी फोन करून या निवडीसंबंधी आपणास माहिती दिली व अभिनंदन केले, असे आपल्या निवडीसंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना आर्लेकर यांनी सांगितले.
विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन : आर्लेकर
राज्यपालपदी नियुक्ती होणे ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पदावर नियुक्त करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खास करून भारतीय जनता पार्टीने माझ्या योग्यतेचा विचार केला व माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे माझे प्रयत्न असतील व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत राहीन, असे ते पुढे म्हणाले.
यापूर्वी मी गोवा विधानसभेचा सभापती होतो. त्या पदाची जबाबदारी तटस्थ राहून पार पाडावी लागते. राज्यपालपदीसुद्धा अशाच प्रकारे तटस्थ राहून जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे सभापतीपदाचा अनुभव येथे कामी येईल, असे त्यांनी सांगितले. गोमंतकीयांनी जगाच्या पाठीवर आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन अशा सर्वोच्च पदी झालेली निवड हाही त्याचाच भाग असे मी मानतो, असेही आर्लेकर म्हणाले.
तिसरे गोमंतकीय राज्यपाल
राज्यपालपदी नियुक्ती झालेले आर्लेकर हे तिसरे गोमंतकीय ठरले आहेत. यापूर्वी अँथनी एल. डायस आणि माजी जनरल सुनीत रॉड्रिग्स या गोमंतकीयांनी राज्यपालपद भूषविले आहे. त्यापैकी डायस हे 1971 ते 1979 या दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल तर रॉड्रिग्स हे 2004 ते 2010 या दरम्यान पंजाबचे राज्यपाल होते.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजेंद्र आर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. आर्लेकर यांच्या या निवडीबद्दल आपणास आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोव्याचा सन्मान : तानावडे
आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती होणे हा गोव्याचा सन्मान आणि प्रत्येक गोमंतकीयासाठी गौरवपूर्ण क्षण आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली आहे.
गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट : नाईक
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सर्व गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असेही नाईक यांनी पुढे म्हटले आहे.
अभिनंदनीय निवड : कामत
राजेंद्र आर्लेकर यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निवडीसाठी आपण त्यांचे अभिनंदन करतो तसेच त्यांना सुयश चिंतीतो असे कामत यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
गोवा फॉरवर्डला आनंद
राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. गोव्याच्या राजकारण्यास असा बहुमान प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण आर्लेकर यांचे अभिनंदन करत आहे, असे फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
नवी ओळख निर्माण करतील : गोवा सुरक्षा मंच
आपल्या आमदार तथा मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कामाचा ठसा उमटवणारे राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोवा सुरक्षा मंचने अभिनंदन केले आहे. सभापती असताना ’कागद विरहित कामकाज’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण निर्णय ठरला होता. उत्तम वक्ते व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आता राज्यपाल म्हणूनसुद्धा ते आपली नवी ओळख निर्माण करतील, अशी आशा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
सभापती राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचा अल्प परिचय
जन्म : 23 एप्रिल 1954
शिक्षण : बी. कॉम
पत्ता : जी-1, गोल्डन हिल्स अपार्टमेंट, मांगूर वास्को, गोवा
राजकीय कारकीर्द : 2002 च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवड. 2012 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सभापतीपदी निवड. 2015 मध्ये मंत्रीपदी निवड. वास्को आणि पेडणे मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व.
पक्षातील पदे : दक्षिण गोवा माजी जिल्हा अध्यक्ष, भाजपा राज्य कार्यकारिणीत माजी सचिव, माजी सरचिटणीस. 2003 ते 06 दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष. 2006 ते 09 दरम्यान भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य. 2010 ते 2012 भाजपा प्रवक्ते.
गोवा राज्यपालपदी पी. एस. श्रीधरन पिल्लई
गोव्याच्या राज्यपालपदी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राष्ट्रपतींकडून त्यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. पिल्लई हे सध्या मिझोरामचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. गोव्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोशियारी होते.
गोव्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, त्रिपुरा, हरियाणा आणि मिझोराम या आठ राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
पिल्लईंच्या नावावर 125 पुस्तके
गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलेले श्रीधरन पिल्लई यांनी यापूर्वी केरळ राज्याचे भाजपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. पेशाने वकील असलेले श्रीधरन हे राजकारणात सक्रीय असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे 125 पुस्तके लिहिली आहेत. गोव्यात येण्यापूर्वी ते मिझोरामचे 15 वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
राजकीय कारकीर्द अभाविपमधून सुरु
आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली. महाविद्यालयीन काळात ते विद्यार्थी परिषदेचे राज्य सचिव होते. त्यानंतर कोझिकोडे जिल्हा अध्यक्ष, राज्य सचिव आणि सरचिटणीस यांसह भाजपमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. 2003 ते 2006 या काळात ते केरळ भाजपा प्रदेशाध्यक्ष होते. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सने केरळ आणि लक्षद्वीप या दोन जागा जिंकल्या. 2018 मध्ये त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 25 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अल्प परिचय
केरळ राज्याच्या अलापुझा जिह्यातील व्हेनमोनी गावात 1953 मध्ये जन्मलेले श्रीधरन पिल्लई हे बहुआयामी अत्यंत हुशार, दानशूर व्यक्तीमत्व. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ राजकारणी. पेशाने वकील. नामवंत साहित्यिक. त्यांच्या नावावर इंग्रजी, मल्याळम आदी भाषातून लिहिलेली 125 पुस्तके आहे. त्यात कायदा, राजकारण, साहित्य, कविता यांचा समावेश आहे. विविध टीव्ही चॅनलवर ते सदैव सक्रीय असत. सढळहस्ते मदत करण्यातही ते अग्रेसर आहेत. गोव्यात येण्यापूर्वी ते मिझोरामचे 21 वे राज्यपाल होते.