ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यसेवेची 13 सप्टेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा आता 20 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 13 सप्टेंबरला NEET ची परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यास उपकेंद्रांची उपलब्धता व इतर प्रशाकासकीय अडचणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेचे पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार परीक्षा 13 सप्टेंबरला घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.