दिवसभरात नवे 453 रुग्ण : पाच जणांचा मृत्यू : 225 कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून मागील 24 तासांत 453 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 9150 वर पोहाचली आहे. दरम्यान, दिवसभरात 5 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी 225 जण कोरोनामुक्त झाले. त्यानुसार 5618 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3391 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने रविवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार मागील 24 तासांत बेंगळूर शहरात सर्वाधिक 196 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढतीच आहे. बळ्ळारीमध्ये 40, गुलबर्गा, विजापूर जिल्हय़ात प्रत्येकी 39, म्हैसूरमध्ये 18, गदग 18, धारवाड 15, बागलकोट जिल्हय़ात 14, बिदरमध्ये 13, दावणगेरे, कारवार आणि कोलारमध्ये प्रत्येकी 8, मंगळूर 7, मंडय़ा आणि हासन जिल्हय़ात प्रत्येकी 5, तुमकूर 4, यादगिरी, चिक्कबळ्ळापूर आणि हावेरीमध्ये प्रत्येकी 3, रायचूर, शिमोगा आणि रामनगर जिल्हय़ात प्रत्येकी 2 आणि चिक्कमंगळूरमध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात रविवारी बेंगळुरात तीन आणि बिदरमध्ये दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार मृतांची संख्या 137 वर पोहोचली आहे. दिवसभरातील 453 बाधितांपैकी 69 जण आंतरराज्य प्रवाशी तर 05 विदेशातून आलेले आहेत.