आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाची स्थिती समाधानकारक नियंत्रणात असून अनेक रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत असल्यामुळे इस्पितळांवरील ताण बराच कमी झाला आहे. आता कोरोना नियंत्रणात आल्यानंतर दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यात येणार आहे, तेथे लवकरच आयसीयुची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. होम आयसोलेशनमधील रुग्णांना स्वतपासणी किट उपलब्ध करून देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. त्याचा अनेकांना चांगला फायदा झाला. या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी तृतीय वर्ष एमबीबीएसच्या अनेक विद्यार्थ्यानी मुख्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून काम केले. यामागे आम्ही राज्यातील कोविड रुग्णांना सर्वात चांगली सेवा कशाप्रकारे देऊ शकतो ही त्यामागील संकल्पना होती, असे राणे यांनी सांगितले.
कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यास सक्षम
मध्यंतरी कोविड चाचण्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. परंतु आता त्यास गती देण्यात आली असून सध्या 2000 ते 2300 चाचण्या रोज करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचण्याच्या डिजीटायझेशन अनेक रुग्णांचे जीव वाचविण्यात महत्वपूर्ण मदत झाली आहे. होम आयसोलेशन स्वीकारलेल्यांमधील सुमारे 50 गंभीर रुग्णांना सुविधेमुळे त्वरित इस्पितळात स्थलांतरित करणे शक्य झाले. यापूर्वी असे होत नव्हते, असे राणे यांनी सांगितले. सध्या आम्ही कोरोनाच्या कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यास सक्षम आहोत. आमच्याकडे औषधांचा मुबलक साठा आहे. तसेच विद्यमान सुविधा आणखी अद्ययावत कशाप्रकारे करता येतील यावर आमचा भर आहे, असेही राणे म्हणाले.
प्लाज्मा थेरपीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक
प्लाज्मा थेरपीमुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून अनेकांचे जीव वाचविण्यात त्याचे बहुमुल्य योगदान लाभले आहे. गोमेकॉत प्लाज्मा संकलनाचे प्रमाणही बरेच वाढले आहे. रोज सुमारे 25 प्लाज्मा संकलित करण्यात येत आहे. आमच्याकडे सुमारे 2000 प्लाज्मा साठवून ठेवण्याची क्षमता आहे.
प्रत्येक रुग्णाचा आरोग्य अहवाल संकलित करून डिजिटाईज्ड करण्यात येत असल्यामुळे त्यातून नव्याने येणाऱया रुग्णांचे निदान करण्यात व आरोग्य सेवा पुरविण्यात बरीच मदत होत आहे. यापूर्वी आयसोलेशन मॉनिटरिंग कालावधी केवळ 1 ते 10 दिवसांचा असायचा आता तो होम आयसोलेशनसाठी 1 ते 17 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. परिणामी बाधितांची संख्या तसेच मृत्यूचेही प्रमाण बऱया अंशी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.
मृतांचा अभ्यास अहवाल तयार करणार
गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मृत झालेल्या कोरोनाबाधितांचा मृत्यू अहवाल तयार करण्यात आल्यामुळे आम्ही नक्की कुठे कमी पडतो, कुठे सुधारणा आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणात मदत झाली, असे राणे यांनी सांगितले.
कठोर मार्गदर्शक तत्वे घालून सनबर्नला मान्यता देण्यास हरकत नाही : राणे
दरम्यान, अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना, सनबर्नला मान्यता देणे हा आपला विषय नव्हे. आपले काम जनतेचे आरोग्य सांभाळणे आहे. सरकारचा घटक असलो तरीही आपण स्वतः सनबर्नला मान्यता दिलेली नाही. त्यातून कोरोना रुग्ण वाढल्यास आपण जबाबदार राहणार नाही. मात्र कठोर मार्गदर्शक तत्वे घालून आणि पूर्ण दक्षता बाळगून अशा कार्यक्रमास मान्यता देण्यास हरकत नसावी, असे मत राणे यांनी व्यक्त केले.
जगातील अनेक देशात कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्यामुळे दुसऱयांदा लॉकडाऊन करण्याची पाळी आलेली आहे, गोव्यातही पुन्हा तशी पाळी येऊ शकते का? असे विचारले असता, सध्यातरी आम्ही कोरोनाशी योग्यरित्या मुकाबला करत आहोत, त्यामुळे गोव्यात दुसऱयांदा लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि अन्य डॉक्टर्स उपस्थित होते.