बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.
दरम्यान कर्नाटकातही बाधितांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाने ८०० चा टप्पा ओलांडला होता. आता शनिवारी तीच संख्या ९०० च्या वर गेली आहे. राज्यात कोरोनाचे शनिवारी ९२१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ९९२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर १ कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ८,०४२ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक ६३० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर दिलासा देणारी बाब म्हणजे ७८५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या देखील ५,८५३ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.