पर्यटकांशी बेशिस्त वर्तन करणाऱयांची हय-गय नाही
प्रतिनिधी /म्हापसा
पर्यटन इंडस्ट्री ही राज्यातील उत्पन्नाचा प्रमुख कणा असल्याने दर्जेदार पर्यटक प्राप्त करण्यासाठी सरकार तसेच पर्यटनाशी जुडलेल्या स्थानिक व्यावसायिकांकडून संयुक्तरीत्या प्रयत्न झाले पाहिजेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर कांदोळी येथील पर्यटक पोलीस सहायता तसेच माहिती केंद्राचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे आमदार तथा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना, पर्यटन खात्याचे सचिव जे. अशोक कुमार तसेच कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गोव्यात येणाऱया प्रत्येक पर्यटकाची सुरक्षा अतिथी देवो भव तत्त्वानुसार त्यांच्या हीतरक्षणाची जबाबदारी उचलताना राज्यात आजपासून विशेष पर्यटक पोलीस दलाची स्थापना करण्यात येत आहे. पर्यटकांशी बेशिस्त वर्तन करणाऱया कुणाचीही यापुढे गय केली जाणार नसल्याचे सांगून राज्यात आजवर आपल्या खात्यातील 15 जणांना निलंबनाचा आदेश काढलेला आहे. मग ते आपल्या कार्यालयातलही का असेना जे कोणी बेशिस्त वर्तन करेल त्या पोलिसावर त्वरित कारवाई केली जाईल याबाबतची खबरदारी प्रत्येक पोलिसांनी घ्यावी असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी खंबीरपणे यावेळी पोलीस वर्गाना दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने राज्य सुरक्षित असल्याचा संदेश जगभरात पोहोचविण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटकांच्या सुरक्षतेकडे गृहखात्याने लक्ष द्यावे- मंत्री मायकल लोबो
राज्यातील पर्यटकांना स्थानिक वाहतूक पोलीस यंत्रणाकडून त्रास होणार नाही याकडे गृहखात्याने लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केली. अधिकाधिक विदेशी पर्यटकांना गोव्यात दाखल करून घेण्यासाठी चार्टड सेवा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्राकडून त्वरित पाऊले उचलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री लोबो यांनी केली. पोलीस महानिरीक्षक मुकेश कुमार मीना यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. पर्यटन खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांनी आभार मानले.
गोव्यात राजकीय पर्यटकही मोठय़ा प्रमाणात
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांविषयी बोलताना राजकीय पर्यटकही गोव्यात बरेच वाढले आहेत, अशी कोपरखळीही मारली. आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण सुरु असल्याने आम आदमी पार्टी, तृणमुल काँग्रेस या पक्षांनी गोव्यात निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे अनेक नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. काहीजण येतात आणि जातात. त्यांचा सरळ उल्लेख न करता राजकीय पर्यटकही गोव्य़ात वाढल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.