उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची घोषणा
वृत्तसंस्था /बेंगळूर
नवे उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याची घोषणा केली. यासंबंधीच्या आदेश पत्रकावर त्यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
आपल्या गृह कार्यालयात उच्च शिक्षण खात्यातील वरिष्ट अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर अश्वथ नारायण यांनी 2021-22 या वर्षापासूनच राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील पदवीपूर्व महाविद्यालय आवारात नवे महिला पदवी महाविद्यालय सुरू करण्याच्या आदेश पत्रकावरही स्वाक्षरी केली.
उच्च शिक्षण क्षेत्रातील उपक्रम सुरू राहणार
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उच्च शिक्षण क्षेत्रात याआधी आपण हाती घेतलेले सर्व उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येतील. तसेच जलदगतीने त्यांची अंमलबजावणी केली जाईल. याच धर्तीवर प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मार्गसूची जारी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.