मागील 24 तासात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू : 204 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी संसर्गमुक्त होणाऱयांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य खात्याच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात 204 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 348 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, दिवसभरात 8 रुग्णांचा बळी गेल्याने कोरोनाबळींची संख्या शंभरच्यावर पोहचली आहे.
राज्यात परराज्य आणि विदेशातून आलेल्यांमुळे रुग्णसंख्येत भर पडत आहे. तर दुसरीकडे मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्याही सातत्याने वाढत आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 2,824 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 72 जण आयसीयुमध्ये आहेत. बुधवारी राज्यात 204 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 106 रुग्ण परराज्यातून तर 2 रुग्ण हे विदेशातून आले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 7,734 इतकी असून त्यापैकी 4,804 जण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी 8 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 102 वर पोहोचली आहे.
मागील 24 तासांमध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ात 55, यादगिरमध्ये 37, बळ्ळारीत 29, गुलबर्ग्यात 19, बिदर 12, मंगळूर आणि धारवाड जिल्हय़ात प्रत्येकी 8, मंडय़ा 7, हासन 5, बागलकोट, उडुपी व शिमोगा जिल्हय़ात प्रत्येकी 4, कारवार, दावणगेरे व चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रत्येकी 3 तसेच बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर व रायचूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळून आला आहे.
बेंगळुरात सर्वाधिक 43 बळी
राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी देखील बेंगळूर शहर जिल्हय़ात 5 रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी याच जिल्हय़ात असून येथे आतापर्यंत 43 रुग्ण दगावले आहेत. बिदर, बळ्ळारी आणि शिमोग्यातही बुधवारी प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.