गुरुवारी फोंडय़ात 66.5 लाखाचे मद्य सापडले : महिन्याभरात राज्यात अनेक ठिकाणी छापे : अनेकांचे परवाने निलंबीत
प्रतिनिधी / पणजी
अबकारी खात्याने काल गुरुवारी फोंडय़ात पेलेल्या धडक कारवाईत तब्बल 66 लाख 50 हजार रुपयांचे मद्य जप्त केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लॉकडाऊनमध्ये एवढा कडक पोलीस बंदोबस्त असतानाही मोठय़ा प्रमाणात दारुची विक्री होत आहे. फोंडय़ातील गुरुवारच्या या कारवाई अगोदर गेल्या महिन्याभरात राज्यात 77 लाख 63 हजारांचे तसेच अन्य काही ठिकाणचे मिळून एकूण सुमारे दीड कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.
राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली असतानाही बेकायदेशीरपणे मद्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी गेल्या महिन्याभरात आल्या. अबकारी खात्याने बेधडक कारवाया करुन अनेक ठिकाणी मद्य जप्तही करण्यात आले. संबंधित व्यवसायिकांचे परवाने निलंबीतही करण्यात आले आहेत.
मद्य जप्त करुन गोदामाला टाळे
अबकारी खात्याचे आयुक्त अमित सतिजा यांनी सांगितले की फोंडा येथील एका गोदामात मोठय़ा प्रमाणात मद्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती बुधवारी संध्याकाळी अबकारी खात्याच्या अधिकाऱयांना मिळाली होती. अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी सुनियोजन करून गुरुवारी संध्याकाळी सदर गोदामावर धाड घातली. मद्याच्या बाटल्या भरलेली सुमारे 1 हजार 810 बॉक्सेस जप्त केली आहेत. तसेच गोदामाला टाळे ठोकण्यात आले आहे.
अडगळीच्या गोदामातून मद्याची विक्री
ज्या संशयिताने मद्याचा हा साठा करून ठेवला होता त्याला राज्यात लॉकडाऊन जारी केल्यानंतर घाऊक मद्य विक्रेत्यांच्या गोदामान टाळे ठोकणार असल्याची माहिती मिळाली होती. लॉकडाऊनच्या काळात अवाच्यासव्वा दरात मद्याची विक्री करायला मिळणार म्हणून संशयितांने मद्याचा साठा अडगळीच्या जागी नेऊन ठेवला होता. संशय़िताने अडगळीच्या गोदामात ठेवलेल्या मद्याची विक्री करायला सुरुवात केली होती, मात्र याबाबत अबकारी अधिकाऱयांना ही माहिती मिळाताच त्यांनी कारवाई केली आणि मद्याचा साठा जप्त केला आहे.
यापुर्वी राज्यात 77 लाखाचे मद्य जप्त
यापुर्वी लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱया विरोधात अबकारी खात्याने बेधडक कारवाई करणे सुरु ठेवले होते आत्तापर्यत 15 तक्रारींची नोंद केली असून 13 मद्यालयाना टाळे ठोकून त्यांचे मद्य विक्री परवाने निलंबीत केले आहेत. सुमारे 77 लाख 63 हजार 23 रुपये किमंतीचे 17 हजार लिटर मद्य जप्त केले होते. त्यात आता काल फोंडय़ात जप्त केलेल्या मद्याची भर पडली आहे.
अनेक कंपन्यांचे मद्य करार निलंबीत
अबकारी खात्याने नोंद केलेल्या 15 तक्रारीपैकी 10 तक्रारी दक्षिण गोव्यातील आहेत, तर 5 तक्रारी उत्तर गोव्यातील आहेत. लॉकडाऊन जारी झाल्यानंतर राज्यातील सर्व मद्य तयार करणाऱया कंपन्यांचे मद्य करार निलंबीत करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांच्या आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री होऊ नये म्हणून अबकारी खात्याचे कर्मचारी गस्त घालीत असतात. एखादा मद्य विक्री करीत असताना अढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करतात. कुणी मद्य विक्री करीत असल्याची तक्रार आल्यासही कारवाई केली जाते तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते असे अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
अबकारी खात्याकडून सरकारी कार्यलयांना सॅनिटायझर वितरीत
कोरोना व्हायरसच्या विरोधात विविध सरकारी तसेच बिगर सरकारी संस्था लढा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारी खातीही त्या कमात मागे राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. अबकारी खात्याने गेल्या काही दिवसात सुमारे 1 कोटी 4 लाख 17 हजार 500 रुपये किमंतीचे 20 हजार 835 लिटर सॅनिटायझार राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात वितरीत केले आहे.