बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात लॉकडाऊन करूनही कोरोनाचा वेग कमी होताना दिसत नाही. सोमवारी कर्नाटकमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर २९.८० टक्क्यांवर गेला. दरम्यान राज्यात सोमवारी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४ हजाराच्या वर गेली. तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही २० हजाराच्या पुढे होती. सोमवारी राज्यात ४४,७३८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह राज्यात उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४४,७३४ वर पोहोचली आहे. तर राज्यात२४ तासात कोरोनावर विजय मिळवून २०,९०१ रुग्ण घरी परतले. सोमवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २३९ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार सोमवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १६,२५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेंगळूरमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. शहरी जिल्ह्यात सोमवारी २२,११२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ८,८४७ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत. जिल्ह्यात २४ तासांत येथे ११५ लोक मरण पावले आहेत.