भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
मागील आठवडय़ात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लॉकडाऊन कालावधीत आर्थिक मदतीचे कोणतेही पॅकेज घोषित करण्याचा विचार सरकारचा नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी राज्य सरकारकडून लवकरच कोविड पॅकेज देण्यात येईल, असे सांगितले आहे.
येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकार परिस्थितीचे अवलोकन करीत आहे. आगामी दिवसांत संकटग्रस्त झालेल्यांच्या अनुकूलतेसाठी सरकार कोविड पॅकेज देणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र सरकारचे निकष समोर ठेवून ज्या ठिकाणी अधिक आवश्यकता आहे तेथे अगोदर ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. केंद्र सरकारने याच निकषाच्या आधारे महाराष्ट्र, राजस्थानला आधी ऑक्सिजन पुरवठा केला आहे. सध्या कर्नाटकात ही जबाबदारी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी सांभाळत आहेत, असेही ते म्हणाले.
सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. सर्वच पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची परिस्थिती आहे, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला. विरोधी पक्षातील नेते घरी बसून सरकारवर टीका करत आहेत. संकटसमयी सरकारसोबत राहून मदत करण्याऐवजी राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.