प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कॅम्पस हिरेबागेवाडीजवळ उभारण्यात येणार आहेत. राज्य सरकारने यासंबंधी निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण सी. एन. यांनी दिली.
शनिवारी विद्यापीठासाठी हिरेबागेवाडीजवळ मंजूर करण्यात आलेल्या जमिनीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 127 एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱयांनी स्वेच्छेने जमीन देण्यासाठी पुढे आल्यास ती खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, जमीन देण्यासंबंधी कोणावरही दबाव आणला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आलेल्या जमिनीवरच बहुग्राम पिण्याची पाणी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पर्यायी जागेत हलविण्याचा विचार आहे. मात्र, ही योजना रद्द होणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या आवारात सर्व व्यवस्था पुरविली जाणार आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी व इतर लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून ही जमीन मंजूर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रामचंद्रगौडा, कुलसचिव बसवराज पद्मशाली, प्रो. एस. एम. हुरकडली, डॉ. आनंद होसूर, एच. एस. शिग्गाव, भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.