अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैनिकांच्या माघारीनंतर निर्माण झालेल्या स्थितीवर लोक याची तुलना व्हिएतनाम युद्धाशी करत आहेत. तालिबानचे दहशतवादी काबूलमध्ये दाखल होताच अमेरिकेला स्वतःच्या राजनयिकांना तेथून बाहेर काढावे लागले. अमेरिकेच्या राजनयिकांना गढवाले वजीर अकबर खान जिल्हय़ातील दूतावासामधून हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. गढवाले वजीर अकबर खानमध्ये राजनयिकांना बाहेर काढणाऱया अमेरिकन हेलिकॉप्टरची तुलना साइगॉनच्या घटनेसोबत केली जात आहे. 1975 मध्ये व्हिएतनामच्या साइगॉनमधून अमेरिकन नागरिकांना दूतावासाच्या छतावरून हेलिकॉप्टरने देशाबाहेर नेण्यात आले होते. पण अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी ही तुलना फेटाळून लावली आहे.
आम्ही 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात पोहोचलो होतो आणि 9/11च्या गुन्हेगारांना धडा शिकविणे हा आमचा उद्देश होता. एक दशकापूर्वीच ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालून अमेरिकेच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यात आला. अल-कायदाचे अस्तित्व देखील आता नाममात्र उरले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवरून अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता त्याच्याकडे नसल्याचे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
तर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने अफगाणिस्तानातील राजनयिकांच्या वापसीची तुलना साइगॉनशी केली आहे. जगभरातील लोक अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीची तुलना साइगॉनशी (हो ची मिन्ह सिटी) करत आहेत. अमेरिकेचे अपयश आणि व्यर्थ सैन्य कारवाईची लोक थट्टा उडवत असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.