फलटणमध्ये भेट – जिल्हा बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर खलबते
प्रतिनिधी/ फलटण
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धुमशान सध्या सुरु असून या निवडणुकीसाठी बँकेच्या विविध मतदारसंघातून तब्बल 141 जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. दि. 10 रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तोफा डागत असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी फलटणमध्ये जावून राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची घेतलेली भेट जिल्हय़ात चर्चेचा विषय ठरली.
जिल्हा बँकेचे निवडणुकीचे धुमशान सुरु झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी तोबा गर्दी झाली होती. याच दिवशी कृषी पणन मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील व शिवरुपराजे खर्डेकर तर सोसायटी मतदारसंघातून महाबळेश्वर तालुक्यातून राजेंद्र राजपुरे यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर उर्वरित मतदारसंघांचे काय होणार निवडणूक लागणार की निवडणूक बिनविरोध होणार याची उत्सुकता जिल्हय़ात आहे.
अर्ज भरल्यानंतर दोन तीन दिवस खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेच्या कामाचे कौतुक करतानाच जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जावरुन बँकेची ईडीने केलेल्या चौकशीवरुन तोफ डागली. त्यामुळे चेअरमन म्हणून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना उत्तरे दिली. वातावरण तापू लागले असतानाच दीपावली आल्याने आरोप व प्रत्यारोप थांबले. मात्र, अंतर्गंत राजकीय हालचाली सुरुच होत्या व अद्यापपर्यंत आहेतच.
जिल्हा बँक निवडणुकीचा आढावा राष्ट्रवादीचे सुप्रिमो यांनी खुद्द बारामतीत घेतला. त्यावेळी झाडून सर्व नेते उपस्थित होते. अपवाद उदयनराजे व आमदार शेखर गोरे वगळता. याच बैठकीत विविध मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी उदयनराजेंची जबाबदारी शिवेंद्रराजेंच्यावर सोपवण्याच्या सूचना केल्या होत्या तर सोसायटी मतदारसंघातील कराडची लढत महत्वाची असून त्या अनुषगांनेही त्यांनी सूचना केल्या होत्या.
रविवारी राष्ट्रवादी पॅनेलची बैठक झाली. या बैठकीत गृहनिर्माणमधून राष्ट्रवादी पॅनेलतर्फे उमेदवार देण्याचा तसेच तो निवडून आणायचाच असा चंग बांधण्यात आला. याच्या दुसऱयाच दिवशी उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेऊन तब्बल दिड तास चर्चा केली. त्यामुळे या चर्चेत नक्की काय ठरलं हे समजू शकले नाही. त्यामुळे या भेटीवरुन तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
आता अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत एक दिवसावर येवून ठेपली असताना नेहमीप्रमाणे हटके स्टाईलने खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली. त्यांनी चक्क फलटणला प्रयाण केले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी-विलास निवासस्थानात त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी एकाच खोलीत तब्बल दीड तास हे दोन्ही नेते चर्चा करत बसले होते. आता त्यांच्यात नेमकी काय खलबते झाली हे कळले नाही.
मात्र, उद्या अर्ज माघारीच्या दिवशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कोण अर्ज माघारी घेणार, कोणते मतदारसंघ बिनविरोध होणार आणि कोणत्या मतदारसंघात निवडणूक लागणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून याच पार्श्वभूमीवर फलटणमध्ये रामराजे व उदयनराजे यांच्यात झालेली भेट देखील महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, यावेळी उदयनराजेंनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांचीही भेट घेवून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत सुनील काटकर उपस्थित होते.