चिपळुणातील बेकायदा गुरे वाहतूक प्रकरण, जामिनावर मुक्तता
प्रतिनिधी/ चिपळूण
काही दिवसांपूर्वी कराडकडे 15 बैल घेऊन जाणारा आयशर टेम्पो शहरातील बहाद्दूरशेखनाका येथे गस्त घालणाऱया पोलिसांनी पकडला. या घटनेनंतर गायब असलेल्या यातील मुख्य सूत्रधार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयासह आणखी एकाला अटक करण्यात आली. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर दोघांची गुरूवारी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
रियाज खेरडकर, अल्लीसाहब बालमिया चौघुले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील खेरडकर हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. दाऊद दफेदार हा 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील आयशर टेम्पोत दाटीवाटीने भरलेल्या 15 बैलांची मार्गताम्हाने ते कराड अशी वाहतूक करीत होता. हा टेम्पो बहाद्दूरशेखनाका येथे आला असता तो गस्तीच्या पोलिसांनी अडवला. यावेळी त्याची चौकशी केली असता हे बैल रियाज याच्या सांगण्यावरून कत्तलीच्या उद्देशाने नेले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडून 15 बैल व टेम्पो असा सुमारे 8 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
त्याला अटक केल्यानंतर तो काही दिवस पोलीस कोठडीत होता, तर रियाज गायब झाला होता. तपासात चौघुले याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी रियाज व चौघुले या दोघांनाही अटक केली आहे. एक दिवस पोलीस कोठडीत राहिलेल्या या दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वागणेकर करीत आहेत. दरम्यान, रियाज हा राष्ट्रवादीचा क्रियाशील पदाधिकारी असल्याने त्याच्या अटकेमुळे खेर्डीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.