विकास कामांतून राष्ट्रवादीला डावलण्याचे काम शिवसेना करते
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग आहे. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना विकास कामात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहभागी करून घेत नाही. याबाबत सोमवारी सावंतवाडीत पक्षनिरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातील कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन संतप्त कार्यकर्त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार सांगता यात्रेचा समारोप 23 एप्रिलला कोल्हापूर येथे होत आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी माने यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरेश गावस, आनंद पिंगुळकर, रेवती राणे, भास्कर परब, बाळ कनयाळकर, रूपेश जाधव, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.