प्रतिनिधी / मिरज
राष्ट्रीय अंधत्त्व निवारण संस्था ( नॅब) च्या अंध निधी संकलनास मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी सांगली शाखेचे पदाधिकारी सतीश पाठारे उपस्थित होते.
नॅब संस्था ही राष्ट्रीय स्तरावर कार्य करते. राष्ट्रपती हे या संस्थेचे प्रमुख आश्रयदाते आहेत. देशपातळीवर अंधध्वज राष्ट्रपतींना प्रदान करून निधी संकलनास प्रारंभ होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात राज्यपालांच्या हस्ते निधी संकलनास प्रारंभ होतो. या निधीचा उपयोग अंध व्यक्तिंच्या मदतीसाठी होतो. त्यांना स्वतच्या पायावर उभे करण्यासाठी विविध व्यवसाय, उद्योग सुरू करून देण्यात येतात. अंध व्यक्तिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे निधी संकलन महत्त्वाचे असते.
यंदा मात्र, कोरोनामुळे निधी संकलन झाले नव्हते. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. याचा प्रारंभ राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा शाखेचे पदाधिकारी सतीश पाठारे, भावेश भाटिया, रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, मनशेट्टीवार, कोषाध्यक्ष जाजू, जातेगावकर उपस्थित होते.