सरकारकडून घोषणा :18 हजार 100 कोटींची योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारच्या पीएलआय अर्थात उत्पादन आधारीत सवलतीच्या योजनेकरीता रिलायन्स, ओला इलेक्ट्रिक, हय़ुंडाई यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती असून लवकरच यासंबंधीची विजेत्यांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
18 हजार 100 कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेकरीता ओला इलेक्ट्रिक व हय़ुंडाई यांच्यासह रिलायन्स व राजेश एक्स्पोर्टस यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. ओला इलेक्ट्रिक, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर, हय़ुंडाई व राजेश एक्स्पोर्टस यांच्या अर्जास सरकारने मंजुरी दिल्याचे कळते.
ओला इलेक्ट्रिक व हय़ुंडाई यांना 20 गिगावॅट तासाच्या क्षमतेचा लाभ तर रिलायन्स व राजेश एक्स्पोर्टस यांना 5 गिगावॅट तासाच्या क्षमतेचा लाभ योजनेंतर्गत मिळणार आहे. 130 गिगावॅट तासाच्या क्षमतेकरीता 10 जणांनी बोली लावली आहे. याअंतर्गत संबंधीत कंपन्यांना बॅटरी निर्मिती कारखाना हा दोन वर्षात बांधून पूर्ण करावा लागणार आहे. याकरीताची सवलत त्यानंतरच 5 वर्षाकरीता लाभप्राप्त कंपन्यांना दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. स्थानिक तसेच जागतिक गुंतवणूकदारांचा सदरच्या योजनेला उत्तम प्रतिसाद दिला होता.