राष्ट्रीय रुग्णवाहीका चालकांना विनाशर्त शासन सेवेत समाविष्ठ करुन घेण्याची मागणी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
रुग्णवाहिका चालक हे 2005 पासुन अल्प मानधनावर कार्यरत आहेत. तरी राष्ट्रीय रुग्णवाहीका चालकांना मेगा भरतीमध्ये विनाशर्त शासन सेवेत समाविष्ठ करुण घ्या, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 102 या रुग्णवाहिके वरील वाहनचालकांनी आज, शनिवार पासून काम बंद आंदोलन पुकारले असल्याचे रुग्णवाहीका चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी सांगितले.
102 या रुग्णवाहीकेवर वाहन चालक हे 2005 पासुन विनाखंड अल्प 5 ते 9 हजार रुपये मानधनावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर मे. ऑस्कॉम प्रायव्हेट लि. कंपनी व इतर संस्थामध्ये अनेक सुशिक्षीत बेरोजगार महाराष्ट्रभर १८०० वाहन चालक रात्रं-दिवस रुग्णांच्या सेवेत चोवीस तास कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही वाहन चालक काम करतात. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही अत्यावश्यक सेवा बजावीत असताना अनेक वाहन चालकांनी नोकरीची वयोमयांदा ओलांडली आहे. आता दुसरीकडे नोकरीची संधी नाही. ठेकेदाराची कामावरुन कमी करण्याची धमकी व जाचक अटी व शर्थी ने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या रकमे पैकी अर्धाही पगार वाहन चालकास दिला जात नाही. वर्षातुन फक्त दोनदाच पगार केला जातो. या वाहन चालकांकडून मेडिसीन आणण्यापासुन ते दवाखान्याचे सर्व कामे करुन घेतली जातात. आकृतीबंद आराखड्यामध्ये वाहन चालकाचे पद मान्य असताना देखिल भरती प्रक्रिया राबवली जात नाही. वाहन चालकाच्या नावे येणारे लाखो रुपये अधिकारी, पदाधीकारी व ठेकेदार हात मिळवणी करुन वाटुन घेतात. यामध्ये वाहन चालक भरडला जात आहे, त्यामूळे या वाहन चालकांना राष्ट्रीय रुग्णवाहीका चालकांना विनाशर्त शासन सेवेत समाविष्ठ करुन त्यांचा प्रश्न सोडवावा, असे निवेदनात म्हणत या वाहन चालकांनी काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.