वृत्तसंस्था/ मेलबर्न
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मेलबर्न समरसेट महिलांच्या टेनिस स्पर्धेत रुमानियाच्या सिमोना हॅलेपने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. हॅलेपने शुक्रवारच्या सामन्यात स्वीसच्या गोलुबिकचा पराभव केला.
आतापर्यंत दोन वेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपद मिळविणारी रुमानियाची हॅलेप हिला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. या सामन्यात हॅलेपने गोलुबिकवर 6-2, 5-7, 6-4 अशा सेट्समध्ये मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. हॅलेपचा उपांत्य फेरीचा सामना चीनच्या झेंग वेनशी होणार आहे. झेंग वेनने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात क्रोएशियाच्या कोंजुचा 7-6 (7-1), 7-6 (8-6) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
महिलांच्या दुसऱया एका स्पर्धेतील सामन्यात अमेरिकेच्या अमांदा ऍनिसीमोव्हाने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविताना रुमानियाच्या बेगूचा 2-6, 6-3, 6-3 असा पराभव केला. ऍनिसीमोव्हा आणि रशियाची कॅसेटकिना यांच्यात उपांत्यफेरीची लढत होईल. कॅसेटकिनाने स्पेनच्या डायझचा 7-5, 6-1 असा पराभव केला.