बेळगाव / प्रतिनिधी
रस्त्यावर लावलेल्या रिक्षा व खासगी वाहने यामुळे रेल्वेस्टेशन रोडवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते. रेल्वे आल्यानंतर होणारी गर्दी आणि त्यातच बसस्थानकातून बाहेर पडणारी वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.
रेल्वेस्टेशनच्या मुख्य इमारतीचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात दुसऱया ठिकाणी प्रवेशद्वार केले आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळच रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे. सध्या ग्लोब थिएटर रोडचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. हेस्कॉम कार्यालय, रेल्वेस्टेशन व बसस्थानक एकाच ठिकाणी असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे.
गोवा बसस्थानकातून बाहेर पडणाऱया बसेसना याचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागत आहेत. यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे. रेल्वे आल्यावर किमान अर्धा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रिपेड रिक्षास्टँड सध्या बंदच
दुसऱयांदा सुरू केलेले प्रिपेड रिक्षा स्टँड पुन्हा एकदा बंद पडले आहे. नवीन प्रवेशद्वार सुरू केल्यापासून प्रिपेड रिक्षा बंद झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा रिक्षाचालक सांगतील तितके भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या विस्कटलेल्या वाहतुकीला योग्य वळण लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे..