स्वस्त धान्य दुकानदार महासंघाची जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे मागणी
शासन देईल ते आपल्याला स्वीकारावेच लागेल : जिल्हा पुरवठा अधिकारी
प्रतिनिधी / कोल्हापूर
एका महिन्यासाठी रेशनवर 1 किलो मका देण्याऐवजी 1 किलो जोंधळा द्या, अशी मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार रॉकेल डेपोधारक संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवतिके यांच्याकडे केली. यावर जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आपली मागणी वरिष्ठांपर्यत पोहोचवू, पण शासन देईल ते आपल्याला स्वीकारावे लागेल, अशी भुमिका घेतली. अन्य प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवतिके यांच्या दालनात सोमवारी दुपारी रास्त भाव धान्य दुकानदार, रॉकेल डेपोधारक संघटनेची बैठक झाली. बैठकीला कॉ. चंदकांत यादव, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दीपक चौगले, सात्विक अबुबकर, संदीप लाटकर, श्रीपती पाटील, बाबासो पाटील, अन्वर मोमीन, अरूण नांगरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेची जबाबदारी प्रशासनाची आहे. पण दुकानदारांना वेठीस धरून हे काम केले जात आहे. अन्नसुरक्षा योजनेचे अनुदान अद्यापी मिळालेले नाही. ऑनलाईन केवायसीला अत्यल्प प्रतिसाद आहे. रेशनकार्ड रद्द संदर्भात प्रशासनाने योग्य खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात मका खाल्ला जात नाही. पण तरीही रेशनवर गव्हाऐवजी 1 महिना 3 किलो मका देण्यात येणार आहे. मक्याऐवजी 1 किलो जोंधळा द्यावा. याशिवाय शासनाच्या डीबीटी धोरणास संघटनेचा विरोध अहे. त्यापेक्षा रेशन व्यवस्था सक्षम करावी, वाहतुकीची नवीन निविदा प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी केली आहे.
बैठकीवेळी झालेल्या चर्चेत कॉ. यादव यांनी, कोल्हापुरात मका, बाजरी खाल्ली जात नाही. त्यामुळे मक्याऐवजी 1 किलो जोंधळा द्यावा, अशी मागणी केली. जिल्हा पुरवठा अधिकारी कवतिके म्हणाले, 1 किलो गव्हाला पर्याय म्हणून 1 महिन्यासाठी 1 किलो मका देत आहोत. शासन देईल ते आपल्याला घ्यावेच लागेल, असे स्पष्ट केले. तसेच अन्न सुरक्षा योजना, डोअर स्टेप डिलिव्हरी वाहतुकीसंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट केले. कॉ. यादव यांनी रेशनवर मका देण्याचा निर्णय रद्द न झाल्यास मोर्चाचा इशारा दिला.