वार्ताहर/ किणये
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्यावतीने नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेला हँडवॉश नळ बसवून दिला आहे. याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष चांगाप्पा यळ्ळूरकर हे होते.
रोटरी अध्यक्ष पवनकुमार उप्पीन यांच्या हस्ते सदर हँडवॉश नळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक आर. पी. सुतार यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यापूर्वी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्यावतीने नावगे मराठी शाळेसाठी शौचालय बांधून दिले आहे. ग्रामीण भागातील मराठी शाळांचा विकास व्हावा व खेडय़ातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे. तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी आम्ही नावगे शाळेला मदत केली आहे, असे मनोगत पवनकुमार उप्पीन यांनी व्यक्त केले.
यावेळी अभय जोशी, आशिष हातगडी, मंजुनाथ अलवणी, एसडीएमसी सदस्य अरुण गुरव, मारुती गुरव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. पी. पाटील यांनी केले. के. के. बेळगावकर यांनी आभार मानले.