पुत्र रुमान बेग यांच्या बेंगळुरातील घरावरही सीबीआयची धाड : महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात
प्रतिनिधी / बेंगळूर
आयएमए ज्वेलर्सने केलेल्या फसवणूक प्रकरणी माजी मंत्री रोशन बेग यांना रविवारी सीबीआयने अटक केली होती. आता बेंगळूरच्या पुलकेशीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. रोशन बेग यांचे पुत्र रुमान बेग यांच्या बंगल्यावरही धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतली आहेत. दिल्लीहून आलेल्या 20 सीबीआय अधिकाऱयांच्या पथकाने सोमवारी सकाळी ही कारवाई पेली आहे.
सकाळी 6 वाजता सीबीआयच्या पथकाने पुलकेशीनगरमधील कोल्स पार्क येथील रोशन बेग आणि त्यांचे पुत्र रुमान बेग यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. तेथे आढळलेल्या कागदपत्रांची दुपारपर्यंत पडताळणी करण्यात आली. रोशन बेग यांच्या बंगल्यावर 7 तर रुमान बेग यांच्या बंगल्यावर 13 सीबीआय अधिकाऱयांनी धाड टाकली. जयमहल येथील यांच्या कार्यालय आणि अतिथीगृहातील कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांची, कामगारांचीही चौकशी करण्यात आली आहे.
आयएमए ज्वेलर्सने अधिक व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. या प्रकरणी आयएमए समुहाचा मालक मन्सूर खान यालाही अटक करण्यात आली होती. मन्सूरकडून रोशन बेग यांनी 400 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आहे. त्यामुळे रविवारी त्यांची चौकशी करून सीबीआयने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे सध्या ते बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात आहेत. त्यांना 14 दिवस कारागृहातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.