शिखर धवन, इशांत शर्मा यांचे अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारतीय संघाचा उपकर्णधार व फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ रोहित शर्माची प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने धमाकेदार प्रदर्शन साकारले होते. कोणत्याही एकाच विश्वचषकात 5 शतके झळकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. त्या कामगिरीची ही पोचपावती मानली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी याबाबत घोषणा केली.
रोहित शर्माशिवाय, त्याचा सहकारी सलामीवीर, डावखुरा फलंदाज शिखर धवन, मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मा, महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे.
इंग्लंडमध्ये मागील विश्वचषकात 5 शतके झळकावणारा रोहित 4 टी-20 शतके खात्यावर असणारा पहिला फलंदाज आहे. याशिवाय, कसोटी पदार्पणात दुहेरी शतके झळकावणारा तो पहिलाच फलंदाज देखील ठरला आहे.
शिखर धवनच्या खात्यावर सर्वात जलद कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम आहे. याशिवाय, आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या इतिहासात सलग दोन वेळा गोल्डन बॅट पुरस्कार संपादन करणारा तो आजवरचा एकमेव फलंदाज आहे. त्याने वनडेत सर्वात जलद 2 हजार व 3 हजार धावा फटकावल्या असून वनडेत सर्वात जलद 4 हजार व 5 हजार धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो दुसऱया स्थानी आहे.
क्रिकेटच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणारा मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मा अलीकडील कालावधीत भारतीय गोलंदाज लाईनअपचा भक्कम आधारस्तंभ ठरत आला असून आशियाबाहेर सर्वाधिक बळी घेण्याच्या निकषावर तो आजवरचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. महिला क्रिकेटमधील अव्वल दर्जाची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिच्या खात्यावर महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नोंद आहे. याशिवाय, एका वनडे लढतीत 6 बळी घेणारी ती एकमेव भारतीय महिला फिरकीपटू आहे.