सर्वांना कोविड हॉस्पिटलमध्ये ठेवणार : आतापर्यंत लंडनहून आले 979जण : सर्वांची आरटीपीसीआर चाचणी सुरु
प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवाच बंद केली आहे. भारतात, आणि गोव्यातही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, गोव्यात लंडनहून आलेल्या प्रवाशांपैकी 10 जण कोरोना पोझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या सर्वांना मडगावच्या ईएसआय कोविड-19 इस्पितळात दाखल केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतातही गेल्या काही दिवसात ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केले जात आहे.
गोव्यात लंडनहून 979 जण दाखल
गोव्यात आतापर्यंत 979 जण लंडनहून आल्याचे आढळून आले आहे. ते सर्वजण गोमंतकीय आहेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 10 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गोव्यात पुन्हा भीतीचे वातावरण
आत्तापर्यंत 10 जण पॉझिटिव्ह आले असून त्यांची स्वॅब चाचणी तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात येईल. त्यानंतरच सद्या ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या जीवघेण्या विषाणूचा या 10 जणांना संसर्ग झालेला आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. सद्या तरी 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने गोव्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सद्या गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या घटू लागल्याने मडगावच्या ईएसआय कोविड-19 हॉस्पिटलमधून काही सामुग्री स्थलांतरित करण्यात आली होती. परंतु, काल जेव्हा विदेशातून आलेले 11 प्रवासी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी लगबग सुरू झाली होती. सर्व यंत्रणा पुर्वीसारखी सज्ज झाली आहे.