ओटवणे / प्रतिनिधी:
ओटवणे गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम रेल्वे विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण उर्फ सुनील काशिराम गावकर (५४) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. गणेशोत्सवात ते गावी आले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ मुंबईत हलविण्यात आले होते.
गेले आठ दिवस त्यांच्यावर मुंबई सेंट्रल येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचे सकाळी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर ठाणे बाळकुंड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणे पवार नगर येथे राहत असलेले सुनील गावकर पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी येथील रेल्वे वर्कशॉपचे ते इंचार्ज होते. मनसेच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ओटवणेसह ठाणे परिसरात शोककळा पसरली. मनसेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे. चिन्मय व केदार गावकर यांचे ते वडील होत. मुंबई सेंट्रल येथील रेल्वे हॉस्पिटलचे निवृत्त मुख्य कार्यालय अधिकारी अनिल गावकर भाऊ होत तर माजी सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांचे ते चुलत भाऊ होत.