ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार यांचे स्पष्ट संकेत
प्रतिनिधी/ बेंगळूर
महागाईमुळे होरपळून निघत असलेल्या राज्यातील जनतेला आता वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. ऊर्जा खात्यातील योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वीजदरवाढ करणे अनिवार्य असल्याचे ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरच वीज दरात वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री व्ही. सुनीलकुमार म्हणाले, ऊर्जा खात्यात काही योजना हाती घेतल्या जात आहेत. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. कर्नाटक वीज वितरण आयोगाच्या (केपीसीएल) शिफारसीप्रमाणे वीज दरवाढ होणार आहे. ऊर्जा खात्याला ग्रामविकास, पाणीपुरवठा, बेंगळूर शहर पाणीपुरवठा मंडळ या खात्यांकडून 12 हजार कोटी रुपयांची बिले येणे बाकी आहेत. ही बाकी वसुलीसाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे ते म्हणाले.
महिनाभरापूर्वी राज्यातील सर्व वीज पुरवठा कंपन्यांनी वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. यापूर्वी जून 2021 मध्ये प्रतियुनिट 30 पैसे वीज दरवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा वीज दरवाढीचा धक्का देण्यास सरकार सरसावले आहे.