आफताब पुनावालाला फासावर लटकविण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
‘जस्टीस फॉर श्रद्धा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘लव्ह जिहादला विरोध करा’ अशा घोषणांनी हमारा देश संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी झांशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती दिनाचे औचित्य साधून टिळकवाडीतील आयएमईआर महाविद्यालयापासून ते आरपीडी सर्कलपर्यंत श्रद्धाच्या क्रूर हत्येचा निषेध करीत मोर्चा काढण्यात आला. ‘श्रद्धाला न्याय द्या’, ‘अपराध्याला त्वरित फाशी द्या’, ‘लव्ह जिहाद थांबवा व कडक कायदे करा’ असे फलक हाती घेत मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चादरम्यान आजूबाजूच्या महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनीही मोर्चात उत्स्फूर्तपणे सामील झाल्या. यावेळी बऱयाच स्त्री-पुरुष व युवकांनी यात भाग घेतला. सुनीता पाटणकर, व्यंकटेश शिंदे, किशोर काकडे, संतोष कागवाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. संदीप भिडे, लक्ष्मीकांत कोटगी, टी. विजयकुमार, परशुराम मंगनिक, मधु मेणसे, पवन जोशी, अजित पाटील, मल्लिकार्जुन कोकणी यांनी मोर्चा यशस्वी करण्याकरिता जबाबदारी उचलली. या मोर्चावेळी सम्राट गोडसे, नागेश बिर्जे, संजय बेळगावकर, मुकेश वेर्णेकर, सूर्यकांत रेड्डी, निखिल कडदावर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.