पहिली लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात : चिनी सैन्याचा थेट सहभाग
वृत्तसंस्था/ बीजिंग
कोरोना विषाणू फैलावण्यात सर्वात आघाडीवर राहिलेल्या चीनने आता लसनिर्मितीच्या शर्यतीत सर्वच देशांना मागे टाकले आहे. चीनमधील डॉक्टर्स, सैन्य, खासगी क्षेत्राने लसनिर्मितीकरता पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. याच कारणामुळे चीनची एक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
चीनने पहिली लस सिनोवॅक बायोटेक कंपनीसोबत मिळून तयार केली आहे. तिसऱया टप्प्याची चाचणी सुरू असलेली देशाची ही दुसरी तर जगाची तिसरी लस आहे. दुसरी लस चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी मेडिकल रिसर्च युनिटने केनसिनो या कंपनीसोबत मिळून तयार केली आहे. चाचणीसाठी याचा मर्यादित वापर सर्वसामान्य लोकांवर करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
चीन इनऍक्टिवेटेड व्हॅक्सिन तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर इन्फ्लुएंजा आणि मीसेल्सची लस तयार करण्याकरता झाला होता. इनऍक्टिवेटेड तंत्रज्ञानाने झालेल्या लसीचा भर आजार फैलावणारा विषाणू संपविण्यावर असतो. अशाप्रकारची लस रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही. तर याउलट अमेरिकेची मॉडर्ना आणि जर्मनीची क्योरवेक बायोटेक कंपनी मेसेंजर आरएनए या तंत्रज्ञानाद्वारे लस निर्मिती करत आहे.
चाचण्यांना मंजुरी
लसनिर्मितीची तयारी युद्धपातळीवर करण्यासाठी चीनने सिनोवॅक आणि सिनोफार्म या कंपन्यांना पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील चाचणी एकाचवेळी करण्याची अनुमती दिली होती. चीनमध्ये लस लोकापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. लसनिर्मितीत पीपल्स लिबरेशन आर्मीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. मागील महिन्यातच सैन्याने कॅनसिनोसोबत मिळून लस तयार केली आहे.
स्वतःवर प्रयोगाची तयारी
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मुख्य वैज्ञानिक चेन वी यांनीच लसीचा पहिला डोज घेतला आहे. अनेक वर्षांपूर्वी सार्सच्या उपचाराकरता होत असलेला प्रयोगही त्यांच्यावरच करण्यात आला होता.
आव्हानेही भरपूर अनेक देश खासगी क्षेत्रासोबत मिळून लस तयार करण्याच्या शर्यतीत पुढे सरकत असले तरीही चीनसमोरील आव्हाने कायम आहेत. चीनमध्ये रुग्ण घटल्याने चाचणीसाठी हॉटस्पॉट मिळत नसल्याचे चित्र आहे. चाचण्यांसाठी अन्य देशांची मंजुरी प्राप्त करण्याचा प्रयत्न चीनने चालविला आहे. परंतु लसीच्या जुन्या वादामुळे बहुतांश देश चीनसोबत मिळून काम करण्यास तयार नाहीत.