सर्व देशांना लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न : अनेक दिग्गज संस्थांचे योगदान : लसखरेदी अन् वितरणात 170 देश सामील
कोविड-19 विरोधातील संघर्षातील लस उपलब्ध झाल्यावर त्याची खरेदी आणि पुरवठय़ाच्या मोहिमेचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा युनिसेफने केली आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर त्याचे प्रारंभिक डोस सर्व देशांपर्यंत सुरक्षित, त्वरित आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी युनिसेफ पार पाडणार आहे. युनिसेफ जगातील सर्वात मोठा लस खरेदीदार आहे. वर्षाकाठी 100 देशांकडून नियमित लसीकरण आणि संसर्ग रोखण्यासाठी 2 अब्जाहून अधिक लसींची खरेदी युनिसेफ करत असते.
‘रिवॉवल्विंग फंड ऑफ द पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायजेशन’ (पीएएचओ) च्या सहकार्याने युनिसेफ कोविड-19 च्या लसीची खरेदी करणार आहे. ‘कोवॅक्स ग्लोबल वॅक्सिन फॅसिलिटी’च्या वतीने 92 अल्प आणि मध्यम उत्पन्नगटातील देशांसाठी डोसचा पुरवठा करणार आहे.
वितरणात 170 हून अधिक देश सामील
ही संघटना 80 उच्चउत्पन्न गटांच्या देशांच्या खरेदीला समर्थन देण्यासाठी खरेदी समन्वयकाच्या स्वरुपातही काम करणार आहे. या देशांनी कोवॅक्स फॅसिलिटीत भाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे आणि हे सर्व स्वतःच्या निधीद्वारे लसीची व्यवस्था करणार आहेत. लसखरेदी आणि वितरण प्रयत्नात 170 हून अधिक देश सामील आहेत. ही जगातील सर्वात मोठी आणि वेगवान मोहीम ठरू शकते असे युनिसेफकडून सांगण्यात आले आहे.
अनेक भागीदार सामील
सरकार, उत्पादन आणि बहुपक्षीय सहकाऱयांमधील भागीदारीद्वारे कोविड-19 महामारीच्या विरोधात मोठी लढाई सुरू ठेवण्याची ही एक मोहीम आहे. जागतिक आरोग्य संघटना, गावी द वॅक्सिन अलायन्स, द कॉलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोवेशन, पीएएचओ, जागतिक बँक, द बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशन आणि अन्य सहकाऱयांसोबत मिळून हा प्रयत्न करणार असल्याची माहिती युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी दिली आहे.
प्रत्येक देशासाठी खुली
कोवॅक्स फॅसिलिटी जगातील प्रत्येक देशासाठी खुली आहे. कुठलाही देश भविष्यात कोविड-19 ची लस प्राप्त करण्यापासून वंचित राहू नये हे सुनिश्चित केले जाणार आहे. सुमारे 28 उत्पादकांनी युनिसेफसमोर कोविड-19 लसींच्या वार्षिक उत्पादनाची (2023 पर्यंत) योजना सादर केली आहे. औषध कंपन्यांनी सामूहिकपणे 1-2 वर्षांमध्ये ‘अभूतपूर्व संख्येत’ लस उत्पादनाची इच्छा व्यक्त केल्याचे युनिसेफकडून सांगण्यात आले आहे.
अनेक मुद्दे महत्त्वाचे
मोठय़ा प्रमाणावर डोसच्या उत्पादनात गुंतवणुकीच्या अनेक बाबींसमवेत क्लीनिकल ट्रायल यशस्वी ठरली आहे की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे. खरेदीपूर्वीच करार करण्यात आला आहे की नाही, निधीची पुष्टी आणि नियामकीय आणि नोंदणीची पद्धत सुलभ आहे की नाही हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. स्वयंवित्तपोषण करणाऱया अर्थव्यवस्था 18 सप्टेंबरपर्यंत कोवॅक्स फॅसिलिटीसाठी पुढे येण्यासाठी पुढील पाऊल असणार आहे. असे घडल्यास कोवॅक्सला लवकर मदत प्राप्त करणे आणि जोखिमयुक्त गुंतवणुकीत व्यापक स्तरावर उत्पादन क्षमता वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
युएनच्या कर्मचाऱयांना बाधा
संयुक्त राष्ट्रसंघाचे (युएन) 200 कर्मचारी सीरियात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे सर्वजण तेथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत होते. युद्धग्रस्त सीरियात मागील दोन महिन्यात 10 पट रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत 3,100 रुग्ण सापडले असून 134 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
ब्रिटन : संसर्ग पुन्हा तीव्र
ब्रिटनमध्ये 2,988 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 22 मेनंतर एका दिवसात सापडणाऱया रुग्णांचा हा आकडा सर्वाधिक आहे. बहुतांशी तरुणवर्गाला कोरोनाची बाधा होत आहे. त्यांच्यामुळे हा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचू नये याची काळजी घेतली जावी असे उद्गार आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी काढले आहेत.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 3 लाख 47 हजार 152 बाधित सापडले असून 41 हजार 551 जण दगावले आहेत.
इस्रायलच्या 40 शहरांमध्ये रात्रसंचारबंदी लागू होणार
इस्रायल सरकारने सोमवारपासून देशातील 40 शहरांमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व शहरांमध्ये मागील काही आठवडय़ांपासून नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 1,708 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशातील बाधितांचा आकडा 1 लाख 30 हजार 644 वर पोहोचला आहे. बेंजामीन नेतान्याहू सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहेत. महामारीवर नियंत्रण मिळविण्यास सरकारला अपयश आल्याची भावना व्यक्त होत आहे.
इटलीत निर्बंधांना विरोध
इटलीची राजधानी रोममध्ये हजारोंच्या संख्येत जमून लोकांनी निदर्शने केली आहेत. फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य करण्याचा सरकारचा आदेश निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधीच आजारी असलेल्या लोकांवरच या महामारीचा प्रभाव पडत असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे.
ब्राझील : 1.26 लाख बळी
ब्राझीलमध्ये 24 तासांमध्ये 14 हजार 521 नवे रुग्ण सापडले असून 447 जण दगावले आहेत. देशात 41,37,606 बाधित आढळले आहेत. तर मृतांचा आकडा 1,26,686 वर पोहोचला आहे. आठवडय़ात 5 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू ओढवल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
अफवा धोकादायक
अफवा कोविडच्या विषाणूपेक्षाही धोकादायक आहेत असे उद्गार पोप फ्रान्सिस यांनी काढले आहेत. कोविड-19 महामारी सुरू झाल्यावर पोप फ्रान्सिस यांनी पहिल्यांदाच जनसमुदायाला संबोधित केले आहे. वॅटिकन सिटीतहा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.
चीनचे उत्तरदायित्व ठरणार
कोरोनाप्रकरणी चीनला मोकळं सोडण्यास अमेरिका तयार नाही. चीनच्या कटामुळे जगभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला असून आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागत आहे. महामारीसाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे उत्तरदायित्व अमेरिका निश्चित करणार असल्याचे विधान विदेशमंत्री पॉम्पियो यांनी केले आहे.