बेंगळूर : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून मंगळवारी रामनगर जिल्हय़ाच्या कनकपूर येथील 73 वर्षीय वृद्धेचा लस घेतल्यानंतर दोन तासांत मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्याच्या हेल्थ बुलेटिननुसार 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत लस घेतलेल्या 21 जणांमध्ये साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.
मंगळवारी सकाळी 11.15 वाजता कनकपूर तालुक्यातील पडूवणगेरे येथील सरकारी इस्पितळात 73 वर्षीय वृद्धा लस घेण्यासाठी आली होती. लस दिल्यानंतर तिला 30 मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यावेळी तिच्यामध्ये लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नव्हते. मात्र, इस्पितळातून बाहेर पडल्यानंतर दुपारी 1.15 वाजता तिचा मृत्यू झाला.