नागरिकांची मागणी : ओळखीच्या नागरिकांना लस देण्यास प्राधान्याचा आरोप : आरोग्य सेतूच्या नोंदीनुसार लस दिली जात नसल्याचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाचा प्रसार वाढल्याने प्रत्येकजण लसीकरण करून घेण्यासाठी धावपळ करीत आहे. लसीकरणासाठी आरोग्य खात्याने आरोग्य सेतू ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. पण ऍपद्वारे दिलेल्या वेळेत लसीकरण करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे दिलेल्या वेळेत लसीकरण होणार नसल्यास ऑनलाईन नोंदणी बंद करा, अशी मागणी होत आहे.
आरोग्य खात्याकडून देण्यात येणाऱया लसबाबत यापूर्वी अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. पण आता असंख्य नागरिकांनी लस घेतली असून पसरलेले गैरसमज दूर झाले आहेत. अशातच कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे लस घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.
गर्दी टाळण्यासाठी आरोग्य सेतू ऍपवर नोंदणी
शासनाकडून वयोमानानुसार लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. आरोग्य खात्याच्यावतीने विविध आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. उपलब्ध लसीच्या साठय़ानुसार लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आरोग्य सेतूच्या ऍपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिकांकडून लसीकरणासाठी आरोग्य सेतू
ऍपवर नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीनुसार नागरिकांना वेळ देण्यात येत आहे. पण आरोग्य सेतुच्या नोंदीनुसार लस देण्यात येत नसल्याचा प्रकार वडगाव आरोग्य केंद्रात सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
लस घेण्याकरिता ऍपद्वारे नोंदणी केली होती. वडगाव आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी रविवारी सकाळी 9 ची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी कोणीच वरि÷ अधिकारी नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी लस घेण्यासाठी व कोरोना चाचणी करण्याकरिता येणाऱया नागरिकांनी गर्दी होत आहे. पण या ठिकाणी कोणतेच नियोजन नसल्याचे दिसून आले. लस उपलब्ध नसल्याने दोन दिवसांनंतर या अशी सूचना आरोग्य सेतू ऍपद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांना करण्यात आली. त्यामुळे नोंदणी करूनही नागरिकांना लस न घेताच परतण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांची तक्रार लस उपलब्ध नसताना आरोग्य सेतुच्या माध्यमातून वेळ कशाला दिला जातो, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लस उपलब्ध असूनही ओळखीच्या नागरिकांना देण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. आरोग्य सेतूवर नोंद केलेल्या नागरिकांना लस द्यावी, अन्यथा नोंदणी करून घेण्याचे बंद करावे अशी मागणी करण्यात आली. लसीकरणाचे काम व्यवस्थित आणि सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.