प्रतिनिधी/ लांजा
दोन जूनपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील कणगवली-पेणेवाडी येथील सीताराम सोमा सुवारे (56) यांच्या खूनप्रकरणी लांजा पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्रे फिरवून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती….
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम सुवारे हे 2 जून रोजी घरातून कामानिमित्ताने बाहेर जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी न परतल्याने त्यांचा मुलगा स्वप्नील याने लांजा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद दाखल केली होती. मात्र 5 जून रोजी सीताराम सुवारे यांची दुचाकी (क्रमांक एम.एच. 08 एस 7162 ही वेरळ कणगवली रोडवर जाधव यांच्या आंब्याच्या बागेजवळ आढळून आली होती. याची माहिती स्वप्नील सुवारे याने लांजा पोलिसांत दिली होती. त्यानंतर लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि वेरळ व कणकवली पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ आणि पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सीताराम सुवारे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
या शोधमोहिमेदरम्यान 5 जून रोजी रात्री बेपत्ता असलेल्या सीताराम सुवारे यांचा मृतदेह एकनाथ जाधव यांच्या आंब्याच्या बागेत त्यांची दुचाकी सापडलेल्या घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर आढळला होता. हा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यानंतर मुलगा स्वप्नील याने आपल्या वडिलांची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन हत्या केली असावी, असा संशय आणि तक्रार लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार लांजा पोलीस ठाण्यात 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी रविवारी 6 जून रोजी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताना दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस तपास करत असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेप्रकरणी लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजाचे प्रभारी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर व लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील या अधिक तपास करीत आहेत.