ट्रक्टर परेड हिंसाचाराप्रकरणी कारवाई
नवी दिल्ली
26 जानेवारी रोजी शेतकऱयांच्या ट्रक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बुधवारी सलग दुसऱया दिवशी दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. लाल किल्ला आणि अन्य ठिकाणी झालेल्या हिंसाचाराचा आरोपी इक्बाल सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात 50 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. इक्बालला पंजाबच्या होशियारपूर येथून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी पोलिसांनी पंजाबी गायक दीप सिद्धूला बेडय़ा ठोकल्या होत्या. दीप सिद्धूला पोलिसांनी पंजाबमधूनच ताब्यात घेतले होते. सिद्धूवर लाल किल्ल्यात समाजकंटकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या समाजकंटकांनी किल्ल्याच्या प्राचीरवर धार्मिक झेंडा फडकवून हिंसाचार केला होता. या घटनेनंतर सिद्धू फरार झाला असला तरीही त्याच्या फेसबुक खात्यावर सातत्याने चित्रफिती अपलोड होत होत्या. कॅलिफोर्नियातील एका महिलेच्या तो संपर्कात होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सातत्याने तो स्वतःचे ठिकाण बदलत होता. सिद्धूला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.