सांगली / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील युवकास १० वर्षाच्या सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. अजय भारत शिंदे (वय २८) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे. १६ जून २०१६ रोजी ही घटना घडली होती. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विनायक मधुकर तथा बाळासाहेब देशपांडे यांनी अंतिम युक्तीवाद केला.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता घरातून गायब झाली होती. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्याच वेळी आरोपी अजय शिंदे हाही त्याच्या घरी नसल्याचे पीडित मुलीच्या नातेवाईकांना समजले. त्यांनी अजयच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल बंद होता. मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपी अजयला मुलीसह येलदरी धरण (ता. जित्तूर, जि. परभणी) येथून ताब्यात घेतले होते.
या ठिकाणी त्याने सातत्याने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. पुरावे गोळा करत आरोपी अजय विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश हातरोटे यांच्यासमोर सुरू होती. परिस्थतीजन्य पुरावे, साक्षी ग्राह्य धरत आरोपी अजय शिंदे याला १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.