लस न घेणाऱयांवर कठोर निर्बंध – नेदरलँड्समध्ये पोलिसांकडून गोळीबार 7 जखमी
ऍमस्टरडॅम / वृत्तसंस्था
युरोपमध्ये कोरोना संक्रमण पुन्हा तीव्र झाल्यावर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांच्या विरोधात निदर्शने होऊ लागली आहेत. शांतताप्रिय देश असलेल्या नेदरलँड्समध्ये दंगलखोरांनी रॉटरडॅमच्या रस्त्यांवर जाळपोळ करत पोलिसांवर हल्ला केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. या हिंसाचारात 7 जण जखमी झाले असून यातील दोन जणांना गोळय़ा लागल्या आहेत.
कोरोना महामारीचे केंद्र ठरल्यावर युरोपीय देश लॉकडाउन, अनिवार्य लसीकरण यासारखे नियम लागू करत आहेत. लस न घेणाऱया लोकांवर कठोर बंधने लादली जात आहेत.
जर्मनीसह अनेक देशांमध्ये लस न घेणाऱया लोकांना दररोज कोरोना चाचणी करवून घ्यावी लागणार आहे. अनेक देशांमध्ये लस न घेणाऱया लोकांच्या प्रवासावर बंधने घालण्यात आली आहेत. जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी सद्यस्थितीला ‘राष्ट्रीय आणीबाणी’ ठरविले आहे. पण त्यांनी देशव्यापी लॉकडाउनला नकार दिला आहे. मागील 24 तासांमध्ये जर्मनीत उच्चांकी 59,266 तर ब्रिटनमध्ये 44,242 नवे कोरोबाधित सापडले आहेत.
ऑस्ट्रियामध्ये लॉकडाउन
ऑस्ट्रिया हा लसीकरण अनिवार्य करणारा पहिला युरोपीय देश ठरला आहे. सोमवारपासून तेथे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याच्या विरोधात व्हिएन्नामध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. मागील 24 तासांमध्ये देशात 15 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एक तृतीयांश लोकसंख्येने अद्याप लस घेतलेली नाही.
अमेरिकेत रुग्ण वाढले
अमेरिकेत सीमा खुली करण्यात आल्यावर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तेथे 14 दिवसांमध्ये 30 टक्के रुग्ण वाढले आहेत. मागील 24 तासंमध्ये 93,196 नवे रुग्ण सापडले असून 1,134 जणांचा मृत्यू झाला आहे. 48 हजार लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.