प्रतिनिधी / शिरोडा
लॉकडाऊन काळात घरबसल्या वेळ घालविण्यासाठी गृहिणींनी विविध खाद्यपर्थांची चविष्ट रेसिपीमध्ये तर पुरुष मंडळींनी काही कलात्मक वस्तू तयार करण्यात स्वतःला गुंतवून घेतले. लॉकडाऊनने माणसांच्या हालचालींना मर्यादा आणल्या खऱया पण त्यांच्या बुद्धिला व कल्पकतेला बंदिस्त करु शकले नाही.
कपिलेश्वरी-फोंडा येथील प्रसिद्ध लिंबूसोडाचे दुकानदार राजनीश आनंद कपिलेश्वरकर यांनी कल्पवृक्ष म्हणजेच माडाच्या विविध अंगापासून कल्पक अशी कलाकृती तयार केली आहे. ‘आर्बोरिक्स आर्ट’ म्हणून प्रचलित असलेली ही कला तशी दुर्मिळ झाली असून लॉकडाऊमुळे तिला प्रायोगिक तत्वावर का होईना पुन्हा चालना मिळाली. राजनीश हे कलाप्रेमी आहेत. नेहमीच आपल्या व्यवसायात व्यस्त राहत असल्याने त्यांना आपल्या अंगभूत कलेकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नव्हता.
विष्णू वाघ, दिलीपकुमार नाईक यांचे प्रोत्साहन
विद्यार्थीदशेत असताना त्यांनी सन 1983 साली गोमंतकातील प्रतिभावंत नाटककार स्व. विष्णू सूर्या वाघ व स्व. दिलीपकुमार नाईक यांच्या आग्रहास्तव अशीच कलाकृती तयार केली होती. आर्बोरिक्स आर्ट प्रकारातील बगळय़ाची सुरेख अशी प्रतिकृती तसेच त्यावर्षी भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्याने या चषकाचीही कलाकृती त्यांनी बनविली होती. त्यावेळी मंगेशी येथील वागळे हायस्कूलमध्ये भरलेल्या अदिती हस्तकला प्रदर्शनात या दोन्ही कलाकृती त्यांनी प्रदर्शित केल्या होत्या. एका कलाप्रेमी पर्यटकाने त्यावेळी तब्बल नऊशे रुपये मोजून बगळय़ाची कलाकृती तर अन्य एक कलाप्रेमीने विश्वचषकाची कलाकृती साडेसहाशे रुपयांना विकत घेतली होती. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात श्री. राजनीश यांनी बगळय़ाच्या अशा पाच कलाकृती विकल्या होत्या. राजनीश कपिलेश्वरकर यांच्यातील या कलेचे विष्णू वाघ यांनी कौतुक करुन ‘कपिलेश्वरीचा बगळा’ अशी मिश्किल उपमाच त्यांना देऊन टाकली होती.
या प्रदर्शनामध्ये विष्णू वाघ यांची व्यंगचित्रे व दिलीपकुमार नाईक यांनी सादर केलेल्या नकला बऱयाच गाजल्या होत्या. अनिल मोडक व अमोद मोडक या संगीत कलाकार बंधूनी सादर केलेली संगीतरजनी या प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या अनेक श्रोत्यांना आजही आठवते, असे रजनीश सांगतात.
सन 1983 सालच्या या प्रदर्शनानंतर तब्बल पस्तीस वर्षे राजनीश कपिलेश्वरकर यांनी या कलेला पुन्हा कधीच हात लावला नाही. व्यवसायात गुंतल्याने तसा योगही आला नाही. मात्र कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनने त्यांना पुन्हा फ्लॅशबॅक होत या कलेकडे वळण्याची संधी मिळाली. ‘आर्बोरिक्स आर्ट’ हा हस्तकलेचा एक प्रकार असून कल्पवृक्ष म्हणजेच माडाच्या विविध अंगांचा कल्पकतेने वापर करीत एखादी सुंदर कलाकृती तयार केली जाते. एकेकाळी ही कला गोव्यात अत्यंत प्रचलित होती. विरंगुळा व व्यावसायिक स्वरुपातही ती जपली जायची असे श्री. राजनीश सांगतात.