प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे. या काळात बेकायदा दारू विकणाऱया एका युवकाला शनिवारी रात्री मार्केट पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून 66 लीटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
भैरू शिवाजी अळवणे (वय 28, रा. महाद्वार रोड) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी संजय धोंडुसा शिराळकर, रा. महाद्वार रोड याच्यावरही कर्नाटक संसर्गजन्य रोग नियंत्रण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून जप्त दारूसाठय़ाची किंमत 26 हजार 136 इतकी होते.
मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी कपिलेश्वर ओव्हरब्रिजखाली ही कारवाई केली आहे. नव्वद एमएलचे टेट्रापॅक विकले जात होते. पोलिसांनी 3 हजार 440 रुपये रोख रक्कमही जप्त केली आहे.
या दोघा जणांवर कर्नाटक पोलीस कायदा कलम 32 व 34 अन्वयेही एफआयआर दाखल झाला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.