श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दर्शविला पाठिंबा
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना रूग्ण संख्या वाढीचा वेग मंदावला असूनही जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी सातारा शहरातील सर्व व्यापारी रस्त्यावर उतरले होते. हातात फलक घेवून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची मागणी करण्यात आली. व्यापाऱयांच्या साखळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले ही यावेळी उपस्थित होत्या.
गतवर्षीपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच हे निर्बंध शिथील करण्यात आले. चालु वर्षी ही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दुसऱया लाटेत रूग्ण संख्या वाढल्याने एप्रिल-मे महिन्यात कडक लॉकडाऊन लागू होते. याच पार्श्वभूमीवर रूग्ण संख्या मंदावली आहे. सध्यस्थितीत सोमवारच्या अहवालानुसार 960 जण बाधित आहेत. परंतु रूग्ण संख्या कमी असताना लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीला परवानगी आहे. कापड दुकाने व इतर साहित्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाला विरोध करत मंगळवारी शहरातील सर्वच व्यापारी रस्त्यावर उतरले होते. दुकाने बंद ठेवत दुकानाबाहेर व्यापारी जमले होते. काही व्यापाऱयांनी लॉकडाऊन रद्द करा, आम्हालाही घर आहे, असे फलक हातात घेतले होते. शांततेत व्यापाऱयांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला. यामुळे शहरातील बाजारपेठेत गर्दी वाढली होती. पोलीसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक ठेवला होता.
श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले चा पाठिंबा
दुकाने बंद असल्याने व्यापाऱयांसह कामगार, तसेच त्यांच्या कुटुंबाला फटका बसत आहे. रोजगार नसल्याने व्यापारीही आर्थिक टंचाईशी सामना करत आहेत. हे जिल्हा प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. चार महिने झाले जिह्यात लॉकडाऊन लागू आहे. तर कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक कशी झाली. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही का ? रस्त्यावर गर्दी, मंडळीत गर्दी आहे. जीवनावश्यक वस्तू सोबत ही दुकानेही सूरू करा. सर्वांना नियमावली लावावी. दुकानदारांनी कर्ज घेतले आहेत. त्यांच्या कर्जाचे हप्ते माफ करा. फक्त बंद नको तर सुविधा ही द्या. इतर राज्यात कोरोना नाही का ? तेथील दुकाने सुरू आहे. तर सातारा जिह्यात दुकाने बंद का ? यांचे उत्तर जिल्हा प्रशासनाने देणे गरजेचे आहे. पुन्हा निर्बंध शिथील करण्याचा विचार केला पाहिजे.
शहर पुन्हा गजबजले…
रूग्ण संख्या आटोक्यात असूनही फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीला परवानगी देलेली आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून खरेदीला गर्दी उसळली होती. बाजारपेठा ते रस्ते गजबजले होते. सातारकर नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढली. यामुळे कोंडी निर्माण झाली. दुपारी दोन नंतर ही गर्दी कमी झाल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
विविध भागात पोलीस तैनात
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी व्यापारी रस्त्यावर उतरले. यामुळे शहरात गर्दी वाढली ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांचा फौज फाटा मोठय़ा संख्येने शहरात तैनात होता. तसेच पोवईनाका येथे पोलीस वाहनधारकाची चौकशी करत हेते. विनाकारण फिरणाऱयावर कारवाईं करण्यात आली.
छुप्या पद्धतीने विक्री सुरू
दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असले तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीला येणारे ग्राहक काही इतर साहित्य खरेदी करतील. या आशेने विक्रेते दुकानाचे शर्टर बंद करून बाहेर बसत आहेत. येणाऱया ग्राहकांना कोणती वस्तू हवी आहे. यांची विचारणा करत बंद दुकानाचे शर्टर उघडून छुप्या पद्धतीने देण्यात येत आहे.