जम्मूचे खासदार जुगल किशोर शर्मा यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी / मालवण:
महापुरुष, लोकनायक आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे भर समुद्रात असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर आणि परिसर पाहणे हा सुंदर आणि विलोभनीय अनुभव आहे. आजच्या दौऱयात हे मंदिर आम्ही पाहिले नसते, तर लोकनायकांना अभिवादन करता आले नसते. याठिकाणी आल्यानंतर सिंधुदुर्गाची महती ज्ञात झाली. या जिल्हय़ाच्या विकासासाठी आम्ही आमच्या समितीतर्फे प्रयत्नशील राहू, अशा शब्दांत लोकसभा प्राकलन समितीचे सदस्य जुगल किशोर शर्मा यांनी शिवप्रेमींसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकसभा प्राकलन समितीचे प्रमुख खासदार गिरीश बापट आणि त्यांच्या इतर तीन सदस्यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यात जुगल किशोर शर्मा (जम्मू), सुदर्शन भगत (झारखंड), विनायक राऊत (सिंधुदुर्ग-रत्नागिरी) या सदस्यांचा समावेश होता. अर्ध्या तासाच्या दौऱयात या समितीच्या सदस्यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिराची पाहणी केली. याठिकाणी स्थानिक प्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम सकपाळ आणि सयाजी सकपाळ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, मालवण तहसीलदार अजय पाटणे, मंडळ अधिकारी निपाणीकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, यशवंत गावकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, वायरी भूतनाथ उपसरपंच संदेश तळगावकर, प्रसाद चव्हाण, ग्रामसेवक पास्ते, ठाकुर, दिनेश सावंत, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बाबू मांजरेकर, तृप्ती मयेकर, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, पूजा तळाशिलकर, आकांशा शिरपुटे आदी उपस्थित होते.
विनायक राऊतांचे भरभरून कौतुक
जम्मू येथील खासदार जुगल किशोर शर्मा यांनी मंदिरात बोलताना खासदार आणि समिती सदस्य विनायक राऊत यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, राऊत हे लोकसभेमध्ये आणि समितीच्या बैठकांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा आणि आपल्या मतदारसंघातील समस्यांचा वारंवार उल्लेख करून लक्ष वेधतात. आता आम्ही त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर या मतदारसंघातील लोकांच्या समस्यांची जाणीव आम्हाला झाली आहे. राऊत यांच्या रुपाने येथे चांगला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या मतदारसंघातही काम करणार आहोत. त्यांच्या इतके काम आम्हीही अद्याप केलेले नाही, असे सांगितले. राऊत यांच्या पाठिशी आता आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना लोकसभा आणि समितीमध्ये सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
विमानतळ लवकरच सुरू होईल!
चिपी विमानतळ होण्यासाठी खासदार राऊत हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज ही समिती याठिकाणी आलेली आहे. समितीने विमानतळाची पाहणी केली असून समितीचे प्रमुख गिरीश बापट आपला अहवाल शासनाकडे सादर करतील. लोकसभेप्रमाणेच या समितीला खूप अधिकार असल्याने चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आम्हीही सहकार्य करणार आहोत, असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.