नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय वृत्तनिवेदक होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
रोहित सरदाना यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते निवेदन करत होते.
मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालंय. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन. आरआयपी, असं ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.
यासोबतच सुधीर चौधरी हे ट्विट करत म्हणतात, आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना देखील नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम शांती.