प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य ग्रंथालय व बुक लव्हर्स क्लब आयोजित ई-निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी लोकमान्य गंथालयाच्या सानेगुरुजी सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून अरुणा नाईक उपस्थित होत्या. व्यासपीठावर कार्याध्यक्ष अशोक याळगी, बुलकचे अध्यक्ष निखील नरगुंदकर उपस्थित होते.
प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. निखिल नरगुंदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. इंग्रजी निबंधाच्या परीक्षक आरती आपटे व मराठी निबंधाच्या परीक्षक किशोर काकडे यांनी सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे कौतुक केले. अशोक याळगी यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगितले.
अरुणा नाईक यांनी अशा उपक्रमात पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून सहभागी करावे, असे सांगून बालपणीच्या वाचन, पठण व श्रवणाच्या आठवणींना उजाळा दिला.
मराठीतील प्रथम क्रमांक विजेत्या स्नेहल चौगुले व इंग्रजी निबंधातील प्रथम विजेते चक्रवर्ती देवडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. अनघा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल रंजना कारेकर यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पुस्तके भेट देण्यात आली. अंकिता आपटे यांची पुणे आकाशवाणीवर वृत्त निवेदक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पुस्तक देऊन त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. कोविडच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.