प्रतिनिधी /म्हापसा
लोकमित्र मंडळ म्हापसा आयोजित ‘क्रांतीवीर विनम्र अभिवादन’ सोहळा म्हापशाचे नवनिर्वाचित आमदार जोशुआ पीटर डिसोझा आणि म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या उपस्थितीत देशभक्तीने भारलेल्या वातावरणात पार पडला. आज 23 मार्च शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या देशासाठीच्या सर्वोच्च बलिदानाला 91 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवता झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, माजी नगरसेवक तुषार टोपले आणि लोकमित्र प्रशांत बर्वे यांची समयोजित भाषणे झाली. आमदार जोशुआ म्हणाले की, या तिघांचा आदर्श आम्ही तरुणांनी घेवून देशसेवेचे काम पुढे नेऊया. संजय मिशाळ, विद्यमान नगरसेविका प्रिया मिशाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय वालावलकर, सुरेंद्र शेटय़े, विकास महाले, बोशन बिल्डर्सचे ओंकार गायतोंडे तसेच इतर मान्यवर राष्ट्रप्रेमी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन लोकमित्र विजय तिनईकर यांनी केले, सूत्रसंचालन लोकमित्र अविनाश बेळेकर तर आभार लोकमित्र दयानंद सामंत यांनी मानले.