सातारा / प्रतिनिधी :
एनएच 965D या राष्ट्रीय महामार्गावरील लोणंद ते आदर्की फाटा या भागातील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यास मंजूरी देणेबाबत नुकतीच विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोणंद ते आदर्की फाटा अखेर रस्त्याच्या बळकटीकरणासाठी 12 कोटी 89 लाख 61 हजार 423 रुपयांच्या अंदाजपत्रकीय कामास मंजूरी दिली, अशी माहिती खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
सातारा जिल्ह्यातील लोणंद हे ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा मिलाफ असलेले शहर पूर्वीपासून व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. लोणंदवासियांना नोकरी-व्यवसाय, व्यापार-उदिम, शिक्षण, इत्यादी अनेक कामासाठी सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी यावे-जावे लागत असते. तसेच लोणंदच्या कांदा बाजारपेठ व अन्य कारणाकरीता, सातारवासीय देखील लोणंद येथे सातत्याने जात येत असतात. या रस्त्यावरील दैनंदिन वाढती रहदारी तसेच पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून या रस्त्यावरुन दक्षिणेकडे जाणारी जड-वाहतूक विचारात घेवून, या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आल्याने या रस्त्याच्या रंदीकरण, मजबुतीकरण, दर्जोन्नतीसाठी विशेष विनंती गडकरी यांचेकडे वारंवार केली होती.
त्यानुसार पहिल्या टप्यातील आदर्की फाटा ते सातारा या रस्त्याचे काम काही दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. तथापि आदर्की फाटा ते लोणंद अखेर रस्त्याच्या भागाचे मजबुतीकरण प्रलंबीत होते. याकरीता ना. गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी आदर्की ते फलटण या रस्त्याच्या बळकटीकरणासाठी तातडीने मंजूरी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या आणि म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एनएच 956D या रस्त्याच्या लोणंद ते आदर्की फाटा या एकूण 17.145 किलोमीटरचे दर्जोन्नतीच्या कामास 13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी प्रदान केली असून, सदरचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
लोणंद ते सातारा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव सूचवला असून, भविष्यात सदरचा प्रस्ताव देखील मंजूर होवून, गतीमान दळणवळण व्यवस्था अस्तित्वात येईल. दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामुळे आदर्की फाटा ते लोणंद अखेरच्या सुमारे 13 कोटींच्या कामास मंजूरी मिळाल्याने, लोणंदकर आणि सातारा जिल्हावासियांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले आहे.